बलात्कार हा वय वर्षे २ ते वय वर्षे ७५ अशा कोणत्याही महिलेवर होताना दिसतो. त्याला वेळ, स्थळ, काळ, वेश यांचे बंधन नाही. बलात्कार करणाऱ्याला समोरील व्यक्ती ही एक स्त्री / मादी आहे एवढेच निमित्त पुरेसे असते. बलात्कारित स्त्री ही एखाद्या घरात खेळणारी छोटी मुलगी असू शकते, शेतात काम करणारी शेतमजूर असू शकते, रस्त्यात भीक मागणारी भिकारीण असू शकते, कष्टाची कामे करून पोट भरणारी मोलकरीण असू शकते, बुरख्यात वावरणारी महिला असू शकते, आजीच्या वयाची म्हातारी बाई असू शकते. ती स्त्री असते हेच तिचे क्वालिफिकेशन असते बलात्कार होण्यासाठी. हवं तर आसपासची सरकारी इस्पितळे चेक करून बघा. कोणकोणत्या वयाच्या, कोणकोणत्या परिस्थितीतील स्त्रियांवर बलात्कार झाल्यामुळे त्या तिथे उपचारासाठी ऍडमिट होतात ते बघा. मग स्त्री ही आपल्या वेशाने बलात्कारासारख्या हीन गुन्ह्याला आमंत्रणच देत असते अशी पोकळ विधाने करा.