काळजी घ्या, काळजी घ्या हा तर स्त्रियांना जन्मल्यापासून ऐकवला जाणारा मंत्र आहे. कुठवर घेणार काळजी? आखूड / तंग कपडे घातले काय आणि अंगभर घातले काय, पुरुषांच्या नजरेत आणि प्रवृत्तीत जर फरक होत नसेल, तर जन्मल्यानंतर येणारा प्रत्येक क्षण प्रत्येक स्त्रीसाठी धोक्याचाच आहे! कोणीही कोणत्याही क्षणी झडप घालू शकते व तुम्ही बलात्कारासारख्या अधम कृत्याचा बळी पडू शकता! त्यासाठी तुम्ही अन्य काहीही करायची गरज नाहीच मुळी! तुम्ही एक स्त्री आहात एवढेच कारण पुरेसे आहे! कारण उद्या कोणी तुमचे नख पाहून उत्तेजित होऊ शकतो, कोणी पाऊल, कोणी ओठ, कोणी मान, तर कोणी आणखी कोणता अवयव. बरं, तुम्ही स्वतःला नखशिखान्त झाकलेत तरी उपयोग नाही. कारण तुमच्या बाह्याकृतीकडे पाहूनही पुरुषांची मने विचलित होतात. उघडे अंग पाहूनही विचलित होतात, झाकलेले अंग पाहूनही पुरुषांची मने विचलित होतात. भले बाहेर रणरणते ऊन असो, जीवघेणा उकाडा असो, स्त्रीने नखशिखान्त गुदमरवणाऱ्या कपड्यांतच वावरले पाहिजे.... आणि तरीही तिच्यावर बलात्कार होणार नाही याचीही शाश्वती नाही!!! शेवटी वास्तव एकच : स्त्रीला कोणत्याही वेशात, कोणत्याही वयात, कोणत्याही स्वरूपात पाहून कोण्या पुरुषाचे चित्त विचलित होऊ शकते, व त्याचा दृश्य परिणाम ''बलात्कार'', ''बळजबरी'', ''विनयभंग'' अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये होऊ शकतो. हे वास्तव जगाच्या अंतापर्यंत तरी बदलणार का? आजच्या जगात स्त्री-पुरुष समानता नुसतीच मग नावाला म्हणायची! अशी समानता काय जाळायची का मग? पुरुष स्वतःच्या मनाला ''आवर'' घालायला कधी शिकणार? की ती त्यांच्यासाठीची आवश्यकता नाहीच्चे मुळी? त्यांनी खुशाल कधीही - कोणत्याही निमित्ताने उत्तेजित व्हावे, कोणाही स्त्रीला पकडावे, तिच्यावर बळजबरी करावी, वर पुन्हा आमचे मन कसे विचलित होते याचा ओरडा करावा.... हे फारच स्तुत्य आहे. अशा सर्वांचा खरोखर सत्कारच करायला हवा.