माझ्या पाहण्यात अनेक ख्रिश्चन मुली / स्त्रिया आहेत ज्या खोल गळ्याचे, आखूड स्कर्टचे ड्रेस घालून वावरतात. अगदी ३-४ वर्षांच्या मुलीपासून ते ७० वर्षांच्या आजींपर्यंत. त्यांना त्यात काही वावगे वाटत नाही. ती त्यांची संस्कृती आहे. त्यांची पद्धत आहे. शरीराला फिटिंगचे कपडे घालणे हे त्यांच्याकडे रूढ आहे. त्यांच्या घरच्या वा समाजातील पुरुषांचाही त्यास आक्षेप नाही. परंतु हां, रस्त्यावरच्या माणसाचा आक्षेप असू शकतो हाँ! अहो, पण त्या पोरीने किंवा बाईने गळ्यात क्रॉस घातला नाही तर त्याला कळणार का की ती तिच्या संस्कृतीप्रमाणेच वागते आहे? त्याचे मन विचलित होणारच ना?

हो, आणि माझ्या परिचयात बुरख्यात वावरणाऱ्या, गोशा घालून जाणाऱ्या बायकाही आहेत. त्यांच्या वस्तीबाहेर आल्या की त्या कधीतरी क्वचित डोके उघडे टाकतात, किंवा बुरखा हटवतात. पण त्यांना सारखी धास्ती असते, कोणी त्यांना ओळखणारे त्यांना पाहिले तर???? त्यांचे गैरसमज होतील ना मग.... आणि हो, त्यांच्या संस्कृतीत वाढलेल्या मुला/पुरुषाला कोण्या बाईचे मान/ डोके उघडे राहिले तरी ते प्रक्षोभक / उत्तेजक वाटू शकते बरं का!!!!

माझ्या परिचयात काही साड्या नेसणाऱ्या स्त्रियाही आहेत. आपला पदर घसरला नाही ना, साडी पारदर्शक तर वाटत नाही ना, कमरेच्या खाली तर फार नेसली गेली नाही ना, पोट-पाठ फार उघडे राहिले नाही ना, फार चापून चोपून नेसली गेली नाही ना याची काळजी करणाऱ्या. पण त्यांना काय माहित की त्यांनी अंग कितीही झाकले तरी ते समोरच्या कोणा पुरुषाला उत्तेजक वाटू शकते! बिच्चाऱ्या!! 

काही मुलींचा तर उगाच गैरसमज असतो की फॉर्मल कपडे म्हणजे स्कर्ट, टॉप, त्यावर कोट, शूज, स्टॉकिंग्ज वगैरे. कारण म्हणे पाश्चात्य जगात त्याला फॉर्मल ड्रेस म्हणतात. असा फॉर्मल ड्रेस घालणे सभ्यतेचे लक्षण असते म्हणे! त्यात स्कर्टची लांबी मांडीपासून ते गुडघ्यापर्यंत असू शकते (माझ्या अपुऱ्या ज्ञानानुसार!! ) काही ठिकाणी तर मुलींना असा गणवेश सक्तीचा असतो. (आठवा, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील स्त्रिया, हवाईसुंदऱ्या!! ) तर.... आता समस्त पुरुषजमातीने एकत्र येऊन स्त्रियांनी काय वस्त्रे घालावीत, ती त्यांनी कोणत्या मानसिकतेने घालावीत, कशा प्रकारे घालावीत इत्यादीची एक यादीच बनवावी. तेच 'योग्य' होईल!!!