भारतात पुरुष तर परंपरागत आणि सहजरीत्या असे तोकडे कपडे घालत आलेले आहेत.

जसे, बनियन. (मराठीत: 'गंजीफ्राक'. तसा 'बनियन' हाही मराठीच शब्द आहे म्हणा!) तोही, तोकडेपणात भर पडावी म्हणून की काय, पण भोके पडलेला. किंवा, चट्टेरीपट्टेरी अर्धी विजार. अशा पेहरावात कोपऱ्यावरच्या दूधकेंद्रापर्यंत अथवा नाक्यावरल्या वाण्याच्या दुकानात जाऊन यायला आजतागायत कोणालाही (किमानपक्षी, संबंधित वाक्याच्या कोणत्याही कर्त्याला) काहीही आक्षेपार्ह, विचित्र अथवा कुचंबणात्मक ('ऑकवर्ड' अशा साधारण अर्थी) वगैरे वाटल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना, काही समाजगटांत आणि/किंवा समाजस्तरांत अशी प्रथा ही सामान्य आहे, असेही कळते.

याउपर, आजतगायत कोणी असे केल्याने संबंधित कर्त्याकडे कोणीही आकर्षित झाल्याची नोंद इतिहासात दाखल नाही; किंबहुना, असे करण्यामागे  कोणाला आकृष्ट करण्याचा कर्त्याचा उद्देश असावा असेही वाटत नाही.

अशा प्रकारची वेशभूषा आणि पुरुषांवरील बलात्काराचे प्रमाण यांच्यात काही अन्योन्य अथवा अन्य संबंध दाखवणारा विदा तूर्तास उपलब्ध नाही.

उलटपक्षी, मुंबईच्या चाळींत - गिरगांव, दादर-नायगांव वगैरे भागांत (विशेषतः उकाड्याच्या दिवसांत), अंगावरची कंचुकीसमान वस्त्रे काढून टाकून शरीराच्या ऊर्ध्वभागावर केवळ साडीच्या पदरानिशी अगदी बिऱ्हाडाच्या दर्शनी खोलीतसुद्धा कोणतीही कुचंबणा न बाळगता बसलेल्या आणि (चाळीच्या बिऱ्हाडाच्या सदैव उघड्या दरवाजातून कधीही डोकावणाऱ्या आणि कधीही घरात शिरून तासन्‌तास गप्पा मारणाऱ्या) शेजाऱ्यांशी (पुरुषांशीसुद्धा) विनासंकोच मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी स्त्रियांची दृश्येही एके काळी सर्रास पाहिलेली आहेत. पैकी कोणाही संबंधित स्त्रीवर यामुळे बलात्कार वगैरे झाल्याचे सोडा, त्यांजकडे कोणी यामुळे आकर्षित वगैरेही झाल्याचे ऐकिवात नाही.

(एके काळी मुंबईत / गिरगांव - दादर-नायगांव वगैरे भागांतच कशाला, पण इतरत्रही, माझ्या आजीच्या पिढीत, इतर समाजगटांबद्दल आणि सामाजिक स्तरांबद्दल नक्की माहीत नाही, पण किमानपक्षी मध्यमवर्गीय ब्राह्मणांत तरी - त्यातही कोकणस्थ, सारस्वत वगैरे इतर ब्राह्मणगटांबद्दल निरीक्षणाअभावी खात्रीलायकरीत्या कल्पना नाही, परंतु माझ्या स्वल्पनिरीक्षणावरून निदान देशस्थ आणि कऱ्हाडे ब्राह्मणांत, असे उन्हाळ्याच्या दिवसांत 'उकडते आहे' या कारणास्तव स्वतःच्या बिऱ्हाडात शरीराच्या ऊर्ध्वभागावर फक्त लुगड्याच्या पदरानिशी बसणे ही बाब बहुधा आम असावी, किंवा निदान फारशी असामान्य - 'अनकॉमन' अशा अर्थी -नसावी, असे वाटते. किंबहुना त्यात कदाचित फारसे कोणाला वावगेही वाटत नसावे. पुढील पिढ्यांमध्ये, स्त्रिया शिक्षण घेऊन, चारचौघांत, व्यापक समाजात वावरू वगैरे लागल्यापासून हळूहळू वृत्तीत फरक पडत गेला असावा, संकोच वगैरे येऊ लागला असावा, असा अंदाज आहे. हे अर्थातच स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे अथवा त्यांच्या संचारावर निर्बंध आणण्याचे - त्यांना चारचौघांत, व्यापक समाजांत मुक्तपणे वावरू न देण्याचे - कोणत्याही प्रकारे समर्थन नाही. फक्त, स्त्रियांवरील सामाजिक बंधने आणि स्त्रियांच्या कपड्यांची लांबी यांचा कदाचित कोणताही अन्योन्यसंबंध नसावा या माझ्या प्रेमाइसच्या पुष्ट्यर्थ फॉर-व्हॉटेवर-इट-इज़-वर्थ तत्त्वावर केलेले एक विधान एवढाच याचा अर्थ घ्यावा. शिवाय, स्त्रियांची वेशभूषा, आकर्षकता आणि स्त्रियांवरील बलात्कार यांच्यातील अन्योन्यसंबंध अथवा अन्योन्यसंबंधाचा अभाव प्रस्थापित करण्याकरिता पूरक विदा म्हणून हे स्वल्पनिरीक्षण उपयुक्त ठरल्यास दुग्धशर्करायोगच!)