हे पुरुष किती स्वकेंद्रित असतात पाहा. स्त्रियांनी काहीही केले, त्या नटल्या-थटल्या, केस विंचरले, मनाजोगते कपडे घातले,जरा कुठे ओष्ठशलाका वगैरे लावली तर लगेच पुरुष म्हणणार, बघा, बघा या नटव्या कसे आमचे लक्ष वेधून घेण्यासाठीच हे सगळे करताहेत त्या!

म्हणजे बायकांनी स्वतःच्या निखळ आनंदासाठी काही करूच नये की काय? की अमुक अमुक गोष्टीच बायकांनी त्यांच्या (पक्षी बायकांच्या आणि अतिपक्षी पर्यायाने पुरुषांच्या)आनंदासाठी कराव्यात असे फर्मान पुरुष काढणार आणि बायका ते निमूटपणे पाळणार? 

लग्नसमारंभ,बारशी, मुंजी, वाढदिवस, अशा प्रसंगी बायकांचा उत्साह पुरुषांपेक्षा दांडगा असतो. परिस्थितीनुसार हाताशी जे काही असेल त्यातून साजशृंगार करून त्या आनंदी असतात. ती त्यांची हौसमौज असते. बाई ही जात्याच हौशी असते. हौस म्हणजे हव्यास किंवा वखवख नव्हे. तो पुरुषाकडे असतो.

बायकांचा हा निखळ आनंद (हवे तर) दुरून न्याहाळावा आणि विचलित/उत्तेजित वगैरे न होता स्वतःही आनंदित व्हावे.