श्री गणेशाय नमः ॥
श्री गणेशा मीच करावा म्हणतो...
अथ एकादशोऽध्याय:
श्रीमद्भगवतगीतेच्या अकराव्या अध्यायाला 'विश्वरूपदर्शनयोग' असे नाव दिले आहे. या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास विश्वरूपदर्शन दिले आहे.
अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांकडे विश्वरूप पाहण्याची इच्छा प्रकट केली. अर्जुन ते विश्वरूप चर्मचक्षूंनी पाहू शकला नसता म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास दिव्य दृष्टी दिली आणि त्याला आपले विराट रूप दाखवले. हे सर्व वर्तमान संजय धृतराष्ट्राला सांगत होता.
त्या विराट पुरुषाला अनेक मुखे व अनेक नेत्र असून त्याच्या देहात संपूर्ण विश्व सामावलेले दिसत होते. आकाशात एकाच वेळी जर सहस्र सूर्य प्रकाशू लागले तर त्यांचे जेवढे तेज असेल तेवढे तेज त्या विराट पुरुषच ठिकाणी होते. जगातील सर्व प्राणी त्याच्या मुखात शिरून नष्ट होत आहेत असेही अर्जुनाला दिसले.
ते अत्यंत अद्भुत, दिव्य व भीषण रूप पाहून अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याने भगवंतांना त्यांच्या सौम्य रूपात प्रकट होण्याची विनंती केली. तेव्हा भगवान म्हणाले "मी जगाचा क्षय करणारा 'काल' असून युद्धासाठी आलेले हे द्रोण, भीष्म, कर्ण इत्यादी कौरव आधीच मारले आहेत. तू केवळ निमित्तमात्र होऊन त्यांच्यावर शस्त्रप्रहार कर, युद्ध कर आणि विजयी हो."
नंतर आपले सौम्य रूप धारण करून भगवान म्हणाले- "अर्जुना देवादिकांनाही दुर्लभ असलेले हे माझे विश्वरूप तपाने, ज्ञानाने किंवा यज्ञानेही दिसणारे नाही. केवळ भक्तीनेच ते पाहता येते. आणि भक्तीने जो मला जाणतो, तो माझा परमभक्त मलाच येऊन मिळतो."