मालिका चांगली रंगत आहे. ऊर्जेसंबंधी माहितीबद्दल धन्यवाद.
आता शब्दांच्या वापराविषयी काही प्रश्न -
१. देखभाल कशाप्रकारे केली जाते हे सांगणाऱ्या चौथ्या मुद्द्यातील 'अपशिष्ट' म्हणजे काय? तिथे अवशिष्ट असा शब्द अपेक्षित आहे का?
२. मूलक-कक्ष आणि प्रमाणशीर (आनुपाती) गणक ह्या दोन शब्दप्रयोगांसाठीचे मूळ इंग्रजी शब्द कोणते? कक्ष हा शब्द माझ्यामते विभाग ह्या अर्थी पण जागेसंदर्भात वापरतात. कक्ष हा शब्द खिशात मावणारा मूलक-कक्ष असे वाचताना विचित्र वाटला. मात्र मूळ इंग्रजी शब्द समजला तर पर्याय सुचवता येईल.
आयन हा धन वा ऋण प्रभाराचा असतो. आयन हा नेहमीच प्रभारित कण असतो. रॅडिकल अथवा मूलकामध्ये जोडी नसलेला इलेक्ट्रॉन असतो. मात्र रॅडिकल (मूलक) हा प्रभारित वा प्रभाररहित असू शकतो, आयनाप्रमाणे प्रभारितच असतो असे नाही. तेव्हा मूलक शब्द रॅडिकलसाठी राखून ठेवावा आणि आयनाला आयनच म्हणावे असे माझे मत आहे.
३. ल्युमिनिसंट साठी प्रतिदीप्ती असा शब्द का वापरला असावा? प्रदीप्त, दीप्तीशील योग्य वाटतो, पण प्रतिदीप्ती असा प्रती म्हणजे विरोधी अर्थ दर्शविणारा शब्द का वापरला आहे?
४. फीत म्हणजे पट्टी. फिल्म म्हणजे पापुद्रा. तो पट्टीच्या आकाराचा असल्यास फोटोग्रफिक फिल्म साठी प्रकाशचित्रीय फीत योग्य ठरेल. पण फिल्म ही पट्टीच्याच आकाराची असते असा नियम नाही.
५. बक्कल हा बकल ह्या इंग्रही शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झालेला शब्द आहे. पट्ट्याला बक्कल असते. दप्तराचे बंद लावण्यासाठी बक्कल असते. बॅज म्हणजे बिल्ला, बक्कल नव्हे.
६. उपस्कर हा शब्द हिंदीमध्ये वापरत असावेत, पण त्यापेक्षा इक्विपमेंटसाठी साधन, उपकरण ह्यापैकी सोपा शब्द वापरता आला असता.
७. ऍबसॉर्ब्ड डोस मध्ये संसर्गाचा संबंध कुठे आला? केवळ अवशोषित मात्र पुरेसे व्हावे.
८. न्युट्रॉन व प्रॉटॉन साठीचे अनुक्रमे विरक्तक, विरक्त करणारा कण आणि धनक, धन करणारा कण हे प्रतिशब्द योग्य कसे ह्याचे कृपया स्पष्टीकरण-विवेचन कराल का? मला हे अर्थ योग्य वाटत नाहीत आणि म्हणून पटत नाहीत.