१. देखभाल कशाप्रकारे केली जाते हे सांगणार्‍या चौथ्या मुद्द्यातील 'अपशिष्ट' म्हणजे काय? तिथे अवशिष्ट असा शब्द अपेक्षित आहे का?>>>>हो. अपशिष्ट हा शब्द "न्युक्लिअर वेस्ट" करता हिंदीत अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आलेला आहे. वेस्ट मॅनेजमेंटला अपशिष्ट प्रबंधन म्हणतात. हिंदीत अधिकृतरीत्या स्वीकारले गेलेले शब्द, शक्य असेल तिथे मराठीतही स्वीकारले जावेत असे मला वाटते. त्यामुळे हिंदी व मराठी दोन्हीही भाषांना नवी विज्ञाने व तंत्रे यांचे अनुसरण सहज शक्य होईल.


२. मूलक-कक्ष आणि प्रमाणशीर (आनुपाती) गणक ह्या दोन शब्दप्रयोगांसाठीचे मूळ इंग्रजी शब्द कोणते? कक्ष हा शब्द माझ्यामते विभाग ह्या अर्थी पण जागेसंदर्भात वापरतात. कक्ष हा शब्द खिशात मावणारा मूलक-कक्ष असे वाचताना विचित्र वाटला. मात्र मूळ इंग्रजी शब्द समजला तर पर्याय सुचवता येईल.>>>>मूळ इंग्रजी शब्द प्रपोर्शनल काऊन्टर. अधिक पर्याय सुचवू शकता.


आयन हा धन वा ऋण प्रभाराचा असतो. आयन हा नेहमीच प्रभारित कण असतो. रॅडिकल अथवा मूलकामध्ये जोडी नसलेला इलेक्ट्रॉन असतो. मात्र रॅडिकल (मूलक) हा प्रभारित वा प्रभाररहित असू शकतो, आयनाप्रमाणे प्रभारितच असतो असे नाही. तेव्हा मूलक शब्द रॅडिकलसाठी राखून ठेवावा आणि आयनाला आयनच म्हणावे असे माझे मत आहे.>>>> उत्तराची अपेक्षा नसावी असे दिसते.


३. ल्युमिनिसंट साठी प्रतिदीप्ती असा शब्द का वापरला असावा? प्रदीप्त, दीप्तीशील योग्य वाटतो, पण प्रतिदीप्ती असा प्रती म्हणजे विरोधी अर्थ दर्शविणारा शब्द का वापरला आहे?>>>> मुळात ल्युमिनस म्हणजे स्वयंदिप्त. स्वयंप्रकाशित. दिप्तीमान. (न्यू मॉडर्न स्टुडंस डिक्शनरी.) उष्णता पुरवल्यावर, ऊर्जित झाल्यावर पुन्हा मूळपदावर येण्याकरता जे ऊर्जा विसर्जन केले जाते ती प्रतिदिप्ती. दुसरे योग्य वाटणारे पर्यायी शब्द अवश्य सुचवा. मी आजवर घडवलेले/वापरलेले सर्व शब्द शब्दपर्याय ह्या माझ्या अनुदिनीवर इतरांस सहज उपलब्ध व्हावेत म्हणून अकारविल्हे तसेअ अल्फाबेटिकली रचून ठेवलेले आहेत.


४. फीत म्हणजे पट्टी. फिल्म म्हणजे पापुद्रा. तो पट्टीच्या आकाराचा असल्यास फोटोग्रफिक फिल्म साठी प्रकाशचित्रीय फीत योग्य ठरेल. पण फिल्म ही पट्टीच्याच आकाराची असते असा नियम नाही.>>> कबूल. फोटोग्रफिक फिल्म या अर्थानेच तो शब्द इथे वापरलेला आहे. इतरही पर्यायी शब्दांचे स्वागतच आहे.


५. बक्कल हा बकल ह्या इंग्रही शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झालेला शब्द आहे. पट्ट्याला बक्कल असते. दप्तराचे बंद लावण्यासाठी बक्कल असते. बॅज म्हणजे बिल्ला, बक्कल नव्हे.>>> बिल्ला ह्या शब्दाचाही विचार नक्कीच करता येईल.


६. उपस्कर हा शब्द हिंदीमध्ये वापरत असावेत, पण त्यापेक्षा इक्विपमेंटसाठी साधन, उपकरण ह्यापैकी सोपा शब्द वापरता आला असता.>>>>> इन्स्ट्रुमेंट=उपकरण, डिव्हाईस, ऍपरेटस=साधन इत्यादी शब्द आधीच पारिभाषिक शब्दांत जाऊन बसलेले आहेत. उपस्कर हा शब्द हिंदीत इक्विपमेंट करता अधिकृतरीत्या स्वीकृत आहे. मराठीतही तो का स्वीकारू नये? हे उमगले नाही.



७. ऍबसॉर्ब्ड डोस मध्ये संसर्गाचा संबंध कुठे आला? केवळ अवशोषित मात्र पुरेसे व्हावे.>>> इथे संसर्ग हा शब्द इंफेक्शन या अर्थी वापरलेला नसून एक्सपोजर (रेडिएशन) या अर्थी वापरलेला आहे. मात्र मला हा प्रश्न नीट कळलेला नाही.


८. न्युट्रॉन व प्रॉटॉन साठीचे अनुक्रमे विरक्तक, विरक्त करणारा कण आणि धनक, धन करणारा कण हे प्रतिशब्द योग्य कसे ह्याचे कृपया स्पष्टीकरण-विवेचन कराल का? >>>>> ही चर्चा मुळात मनोगतावरच झालेली होती. दुर्दैवाने ती सापडत नाही आहे. माझ्याजवळ ती कुठेतरी नक्कीच राखलेली असेल. मिळताच अवश्य इथे देईन.


मला हे अर्थ योग्य वाटत नाहीत आणि म्हणून पटत नाहीत.>>>>शक्य आहे.  उत्तराची अपेक्षा नसावी असे वाटते.

वरदा, मी जेव्हा मोठ्या प्रमाणात शास्त्रे मराठीत आणण्याकरता काम करू लागलो तेव्हा वाक्या-वाक्याला पर्यायी शब्दांची गरज जाणवू लागली. तत्काळ सुचेल तो शब्द वापरून सुरूवातीस वाक्ये लिहीली. मग निवडलेले शब्दच इतर निवडलेल्या शब्दांशी स्पर्धा करू लागले. त्यांच्यातही उणे-दुणे करावे लागले. उपलब्ध पाठ्यपुस्तकीय शब्दांचा शोध घ्यावा लागला. बहुतांश वेळा ते उपलब्ध नसत. मग मी पर्यायी शब्दांची यादी बाळगू लागलो. प्रत्येक वेळी नवा शब्द निवडतांना आधी निवडलेल्या शब्दाशी झगडणार नाही हे पाहावे लागले. मी स्वतःच हे सर्व शब्द अनेकदा परिष्कृत केले आहेत. सध्यापुरते त्यांना पर्यायी म्हणून ठेवावे. काळाच्या ओघात सुयोग्य नवे शब्द आढळल्यास त्यांना जागा करून द्यावी असे धोरण मी आता स्वीकारलेले आहे.