१. मराठी शब्द उपलब्ध नसल्यास व तो तयार करावा लागणार असल्यास हिंदीत अधिकृतरीत्या उपलब्ध असलेला शब्द वापरावा हे योग्यच आहे. मात्र मराठीत शब्द उपलब्ध असताना तसे करू नये असे मला वाटते. न्यूक्लिअर वेस्ट साठी आण्विक कचरा असा सुबोध मराठी शब्द असताना अपशिष्ट हा दुर्बोध शब्द का वापरावा? अपशिष्ट म्हणाजे नुसतेच वेस्ट की न्यूक्लिअर वेस्ट? अपशिष्ट शब्दामध्ये "न्यूक्लिअर" हा अर्थ कुठे व्यक्त होतो?
आण्विक कचरा आणि अपशिष्ट हे शब्द वाचल्यावर कोणत्या शब्दाने योग्य बोध होतो हे इतर वाचकांनी कृपया कळवावे.
२. मला प्रमाणशीर वा अनुपाती (आनुपाती नव्हे) गणकाबद्दल आक्षेप नव्हताच. मूलक कक्ष हा अयोनायझेशन चेंबर साठीचा शब्द आह असे दिसते. चेंबर म्हणजे कक्ष हे बरोबरच असले तरी कक्ष हा शब्द चेंबरसाठी वापरतात तो कार्यालयीन/संसदीय विषय असेल तेव्हा. इथे खिशात मावणारा कक्ष विचित्र वाटते. तेव्हा "आयनीभवन पेटी" असे सुचवावेसे वाटते.
आयन व मूलकासंदर्भात उत्तर अपेक्षित नव्हते असे नाही तर तुमचे मत अपेक्षित होते. आयन आणि मूलकामध्ये फरक आहे (तो मी स्पष्ट केला आहेच) तेव्हा मूलक हा शब्द आयनासाठी वापरू नये आणि रॅडिकलसाठी राखून ठेवावा ह्याबाबत तुमचे काय मत आहे? माझे मत तुम्हाला पटते का? असल्यास का आणि नसल्यास का नाही?
३. औष्णिक-प्रतिदीप्ती मात्रामापकाऐवजी औष्णिक-दीप्ती मात्रामापक म्हणावे असे वाटते. प्रति ह्या शब्दाचे प्रयोजन विरुद्ध हा अर्थ व्यक्त करण्यासाठी करतात (प्रतिसरकार, प्रतिक्रिया) तेव्हा प्रतिदीप्तीचा अर्थ दीप्तीविरूद्ध असा होऊ शकतो असे मला वाटते.
६. कृपया साधन, उपकरण आणि उपस्कर ह्यातील अर्थभेद स्पष्ट कराल का?
७. लेखाच्या शेवटी दिलेल्या पारिभाषिक शब्दांच्या तक्त्यामध्ये तुम्ही "ऍबसॉर्ब्ड डोस" साठी "अवशोषित मात्रा संसर्ग" असा शब्दसमूह दिला आहे. इंग्रजी शब्दामध्ये तुम्ही एक्स्पोजर ह्या शब्दाचा अंतर्भाव केलेला नाही, तेव्हा मराठी शब्दामध्येही संसर्ग शब्दाचे प्रयोजन उरत नाही.
अवांतर - मोल्सवर्थच्या शब्दकोशात पुढील शब्द मिळाले -
अहाळणी, अहाळणे , अही , आहळणें - (१० टक्क्यांहून अधिक रोमन अक्षरे टाळाण्यासाठी अधिक माहिती इथे देत नाही ती दुवा क्र. १ इथे वाचता येईल.
तेव्हा एक्स्पोजरसाठी अहाळणी हा शब्द छान वाटला. रेडिएशन ए़पोजरसाठी प्रारण आहाळणी ह्या शब्दाचा विचार शक्य आहे.
८. न्युट्रॉन, प्रॉटॉनसाठीची मनोगतावरची चर्चा सापडत नसली तरी हरकत नाही. ज्याअर्थी तुम्ही ते शब्द स्वीकारले आहेत त्याअर्थी त्यातून व्यक्त होणारा अर्थ तुम्हाला पटला आहे. तेव्हा धनक वा धन करणारा कण तो प्रॉटॉन हा अर्थ योग्य कसा (हा कण नेमकी कोणाची धन करतो?:), कोणाला धन करतो) आणि विरक्तक वा विरक्त करणारा कण म्हणजे न्युट्रॉन हा अर्थ योग्य कसा (तो नेमका कोणाला विरक्त करतो? कोणातील लाल रंग काढून घेतो? वा कोणाला वैराग्य आणतो) हे कृपया स्पष्ट करा.
(पाठ्यपुस्तकात आणि शब्दकोशात) पारिभाषिक शब्द असतानाही त्यासाठी शब्द घडवून ते पर्यायी शब्द म्हणून वापरावेत असे मला वाटत नाही. काटेकोरपणा हा पारिभाषिक शब्दांची गरज असते, तेव्हा पर्यायी शब्दांची जंत्री वापरू नये असे वाटते. अर्थात शब्द उपलब्ध नसतील तर जरूर निर्माण करावेत आणि तेव्हा योग्य अर्थ त्यातून व्यक्त होत आहे (केवळ शब्दश: भाषांतर नको) ह्याची काळजी घ्यावी, असे माझे मत आहे. असो.