सहमत आहे. पु̮̮. ल. ह्यांचे बरेचसे लेखन तत्कालीन संदर्भांवर अवलंबून आहे. त्या काळाचे बहुतेक प्रत्यक्षदर्शी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्या नंतरच्या दोन पिढ्याही आता वृद्ध झाल्या आहेत. आताच्या पिढ्यांना ते संदर्भ ऐकूनही ठाऊक नाहीत. मग त्यांना ते लेखन कसे भिडणार? तरीही पुलप्रेमाच्या बाळकडूवर वाढलेले आपण हे उघड सत्य स्वीकारायला तयार नसतो. आजच्या पिढीलाच का, आपल्यालाही आज पुलंचे लेखन परत वाचताना ते पूर्वीसारखे हसवत नाही, आनंद देत नाही हे खरे आहे. चिं. वि. जोशी ह्यांचा विनोद बाह्य परिस्थितीपेक्षा मानवी स्वभावातील विसंगतींवर अधिक आधारित असल्यामुळे आजही तेव्हढा कालबाह्य वाटत नाही.
       जिथे पु.लं.नि संदर्भांच्या मर्यादांपलीकडे जाऊन लिहिले आहे ते लेखन आजही अंतरंगाला स्पर्श करून जाते, उदाहरणार्थ  "नंदा प्रधान", "चिंतन (बटाट्याची चाळ)", "रावसाहेब", "माझे खाद्यजीवन" इत्यादी. ह्या उदाहरणांतील प्रत्येकात त्या त्या काळाचे संदर्भ आहेतच, पण त्यांचा आधार घेत, त्यांचा रूपकात्मक वापर करत पु. ल. त्यापलीकडील, कालातीत असे काहीतरी सांगत असतात.