जयंतश्री, सारं जीवन एक नितांत रमणीय टाईमपास आहे कारण निराकार, जो अस्तित्वाचा स्त्रोत आहे त्याच्यावर काहीच उमटू शकत नाही, तो नेहमी कोरा आहे, म्हणून म्हटलंय,

कहेते है ग्यानी दुनिया है पानी, पानीपे लिक्खी लिखाई!

इथे आपला ठसा उमटवू ही इच्छा व्यर्थ आहे. ज्यानी अशी इच्छा ठेवली आणि आयुष्य पणाला लावलं त्यांना सरते शेवटी उद्विग्नता आली कारण त्यांनी अशक्याचा ध्यास धरला होता.

जो ठसा उमटला असं वाटतं तो स्मृतीशिवाय किंवा कागदाची पानं अथवा उभारलेल्या पुतळ्यां व्यतिरिक्त कुठेही उमटू शकत नाही आणि त्याचा उमटवून गेलेल्याला शून्य उपयोग होतो. त्याचं जीवन ठसा उमटवण्याच्या नादात गेलेलं असतं आणि उमटलेला ठसा त्याला पाहता येत नाही. काय असेल कारण त्याच्या उद्विग्नतेच? कारण कार्यरत असताना त्याची नजर नेहेमी इतरांच्या मान्यतेवर असते! जर इतरांनी त्याला मानलं नाही तर तो व्यथित होतो आणि मानलं तर त्याला ती मान्यता टिकवण्यासाठी झटावं लागतं. इतकच नाही तर त्या प्रक्रियेत तो निसर्गाची अपरिमीत हानी करतो (सगळे युद्धप्रवृत्त लोकोत्तर लोक) किंवा मग त्यानी स्वत:च आयुष्य तरी कायम उद्विग्नतेत घालवलं असतं (सगळे ठसा उमटवून गेलेले कलावंत).

मग काय असावं आनंदपूर्ण अभिव्यक्तीच रहस्य? तर आयुष्य हा निव्वळ टाईमपास आहे, इथे ठसा उमटवायचा नाहीये हा बोध आणि मग लोकमान्यतेसाठी झटण्या ऐवजी स्वतःला आनंद देईल अशी अभिव्यक्ती. साधी, सोपी, अस्तित्वाला कमीत कमी धक्का पोहोचवेल अशी नजाकतदार अभिव्यक्ती; मग ते साधं बोलणं असो, लिहिणं असो, निवांत भटकणं असो, खेळणं असो की गाणं की वाद्य वाजवणं, कोणताही अभिनिवेश नसलेली अभिव्यक्ती.

अशा अभिव्यक्तीत सातत्य राहतं कारण तुम्ही लोकोत्तर होण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याला वेठीला धरत नाही आणि त्यामुळे त्याची मान्यता हा तुमच्या अभिव्यक्तीचा निकष राहत नाही आणि तुम्ही कोणताही ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात नसल्यानं तुमची अभिव्यक्ती इतकी सहज आणि सुंदर होते की तो आनंद तुमच्या प्रयत्नातलं सातत्य कायम ठेवतो आणि मग तुमचं सारं जीवन एक मस्त टाईमपास होतो!

संजय