चाळीतलं जीवन समजून घ्यायला चाळीत राहायलाच हवं असं काही नाही. मी स्वतः कधीही चाळीत राहिलेलो नाही. तरीही माझी 'बटाट्याची चाळ' ची पारायणं झाली आहेत. त्यातील प्रत्येक कॅरॅक्टर मला चांगलंच लक्षात राहिलेलं आहे. फक्तं चाळीतील जीवन दाखवणं हा 'बटाट्याची चाळ' चा उद्देश नसावा. वेगवेगळ्या जातीपातींमधली माणसं ज्यावेळी एकत्र राहतात त्यावेळी घडणाऱ्या घटनांचं उत्तम वर्णन पुलंनी अतिशय सहजरित्या केलेलं दिसतं. मुख्यत्वेकरून माणसांचे स्वभावविशेष, समज, गैरसमज यातून घडणारे विनोद पुलंनी दाखवल्याचं जाणवतं. पुलंचे बरेचसे विनोद हे बऱ्याच जणांना पटकन कळत नसावेत. कारण त्यांचे विनोद हे उथळ नसून प्रसंगानी आणि परिस्थितीनी नकळत घडलेले असतात. उदाहरणादाखल, 'व्यक्ती आणि वल्ली' मधील 'बोलट' हे व्यक्तीचित्र. यातील बऱ्याचशा विनोदांना कारूण्याची झालर आहे हे स्पष्ट जाणवते.
'बटाट्याची चाळ' आम्ही वाचलंय असं म्हणणारे किंवा त्यातील बरेचसे ऐकीव संदर्भ नुसतेच चारचौघात (नं वाचता) देऊन फूटेज मारुन नेणारे खूप लोक मला माहिती आहेत. प्रत्यक्षात पहिली चार पानं वाचतानाच अशा लोकांना कंटाळा आलेला असतो. लोकांना इन्स्टंट विनोदात जास्त रस असतो. असो.
तात्पर्य, पुलंचं कुठलच लिखाण आणि कथाकथन कालबाह्य ठरत नाही. याउलट त्यांच्याइतकं उत्तम कथाकथन करणारे फारच कमी आढळतात. शिवाय पुलंनी लिहिलेला काळ हा काही अति जुना काळ आहे असंही नाही. पुलंचं लिखाण समजून घेण्यात रस असेल किंवा ज्यांना खरोखरीच चाळी पाहायच्या असतील, ते आजही मुंबईतील गिरगाव, दादर, वरळी भागात जाऊन सहज पाहू शकतात. चाळीतील वातावरण थोडंफार बदललेलं असेलही पण माणसांच्या वृतींत / स्वभावात फारसा फरक पडलाय असं वाटत नाही.
अवांतरः छत्रपतींवरील (किंवा कुठलेही ऐतिहासिक) लिखाण हे कितीही जुने असले, तरीसुद्धा वाचताना कंटाळा येत नाही.