अतिशय चांगल्या दर्जाची गीते अजूनही लिहिली जातात व तश्याच लक्षणीय चाली आजच्याही संगीतकारांना सुचतात‌. संदीप खरे यांचे काव्य व त्याला सलील कुलकर्णी यानी दिलेल्या चाली हे त्याचे उदाहरण आहे‌ साठीच्या नंतरच्या दशकातच राहुलदेव बर्मन यांचे संगीत फुलले व त्याना गुलजार यांची तशीच दर्जेदार गीते मिळाली , त्यामुळे साठीनंतरची अनेक गाणी कित्येक वर्षे रसिकांच्या  मनात गुंजत राहतील. आजही अजय अतुल यानी आपल्या संगीताने रसिकांना निश्चीतच भुरळ घातली आहे.त्यामुळे संगीत  व काव्य या क्षेत्रात आजचे व कालचे असा भेद करून कोणतेही एक टाकाऊ असा शिक्का मारणे अयोग्यच मग  ते आशा भोसले यांनी केले  काय किंवा इतरही कोणी ! खरे तर ज्या आशाजींनी राहुल देव बर्मन यांची अनेक गीते गायली त्यानी असा शेरा कसा मारला हे आश्चर्यच ! कदाचित आजचे असे म्हणताना त्याना ज्या दिवशी मुलाखत दिली त्या दिवसापासून पुढील काल अभिप्रेत असावा.