गुलजार,सुरेश भट ,ग्रेस या कवींना किंवा राहुलदेव बर्मन,  हृदतनाथ मंगेशकर  ( अगदी नुकतेच दिवंगत झालेले श्रीनिवास खळे सुद्धा )या संगीत दिग्दर्शकांना आजचे समजायचे की नाही ?  कारण हे  साठीच्या दशकात नुकतेच उदयास येऊ लागले होते. मग तरीही  त्यांच्या काव्यात  कल्पनादारीद्र्य आहे किंवा चालीत सुमधुरता नाही असे म्हणणाऱ्यांनी  प्रथम कल्पना रम्यता,सुमधुरता याविषयीचे आपले निकष तसेच आजचे व कालचे या शब्दांच्या त्यांच्या व्याख्या स्पष्ट करून मग आपले म्हणणे माडावे कारण  आजकालचे हा शब्द फार भोंगळपणे वापरला जातो.  आपण काही  कल्पना  मनात धरून  तिच्याशी तुलना करून एकादी गोष्ट उच्च प्रतीची वा कमी प्रतीची ठरवणे हा काही सार्वत्रिक निकष असू शकत नाही. तो वैय्यक्तिक असू शकतो म्हणून तो सर्वमान्य असावा असा आग्रह धरता येत नाही. श्री.बा. सी. मर्ढेकर  आकाशवाणीवर  संचालक  असताना श्री. ग. दि. माडगूळकरांना कवी मानायला तयार नव्हते त्यांच्या मते ते गीतकार म्ह. कवीपेक्षा कमी प्रतीचे होते, त्यामुळे आकाशवाणीवर कवी म्हणून त्यांचा अंतर्भाव करण्यास त्यांचा विरोध होता. शेवटी गदिमांचा " जोगिया : हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाल्यावर त्यांना साक्षात्कार झाला की गदिमा हे खरेखुरे कविराज होते.