कुशाग्रांनी काही चांगले मुद्दे उपस्थित केल्याने इथे माझे मत देतो आहे. मी स्वतःला जुन्या गाण्यांचा चाहता समजतो. जुने म्हणजे किती? १९३१ - ४० मधली गाणी तितकी भावत नाहीत. साधारणपणे लता गायला लागल्यावरची (१९४५ पासून पुढे) गाणी आवडतात. मुकेश, तलत वगैरे गायकही तेव्हाच गायला लागले. किती काळापर्यंतची गाणी आवडतात? नक्की उत्तर देणे कठीण आहे. काटेकोरपणे सांगायचे तर ५ जानेवारी १९८७ या दिवशी संगीतकार जयदेवचा मृत्यू झाला, त्यानंतरची गाणी आवडत नाहीत. साधारण १९४०-६० या वीस वर्षांमधली गाणी उत्तम असे मत असले तरी आशा भोसलेने गायलेले माझ्या मते सर्वोत्तम गीत १९८५ च्या "अनकही"चित्रपटातले कौनो ठगवा नगरिया लूटल हो हे आहे. १९४० - ते १७० मध्येही प्रत्येक गाणे दर्जेदार होते आणि नंतरच्या काळात प्रत्येक गाणे खराब आले हे बरोबर नाही. पण त्या काळात बहरात असलेल्या लता, आशा, मुकेश, तलत या गायक - गायिकांशी, अनिल बिस्वास, नौशाद, रोशन, सलील चौधरी, मदनमोहन, जयदेव, शंकर - जयकिशन यासारख्या संगीतकारांशी आणि शैलेंद्र, शकील, साहिर, मजरूह सारख्या गीतकारांशी नाळ जुळली होती. यातल्या बहुसंख्य लोकांनी अगदी मृत्यू येईपर्यंत उत्तमच गाणी गायली/लिहिली/संगीतबद्ध केली. याचे एक उदाहरण म्हणजे वर दुवा दिलेले आशाबाईंचे गाणे. यातले सर्व लोक एक एक करून गेले. उरलेले खय्यामसारखे लोक आता संगीत देत नाहीत. रहमानसारखे नवीन संगीतकार (खरे तर राहुलदेव बर्मन, लक्ष्मी - प्यारे वगैरेही नवीनच), नवीन गीतकार (समीर), नवीन गायक - गायिका (कुमार सानू किंवा साधना सरगम) यांच्याशी नाळ जुळू शकली नाही. गुलजार चांगला गीतकार खरा, पण आजकाल तद्दन व्यावसायिक झाला आहे. "गोली मार भेजेमें" किंवा "जय हो" किंवा आधीची "चांद चुराके लाया हूं" ही गाणी तद्दन बकवास आहेत. एके काळी "हमने देखी है उन आंखोंकी महकती खुशबू" "एक था बचपन" , "रोज अकेली आये रोज अकेली जाये, चांद कटोरा लिये भिकारन रात" लिहिणारा गुलजार हाच का असा प्रश्न पडतो.
एका वाक्यात सांगायचे तर ज्या लोकांशी नाळ जुळलेली असते त्यांची गाणी आवडतात, मग तिथे काळाचे बंधन राहत नाही. ज्यांच्याशी नाळ जुळत नाही त्यांची जुनी गाणीही आवडत नाहीत (उदा. १९६९ मधली "आराधना" मधली हिट गाणी).
विनायक