"ग" ची बाधा बऱ्याच जणांना झोंबलेली दिसते. पंडित भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, आशाबाईंच्या ज्येष्ठ भगिनी लतादिदी, अशा नामवंत, किर्तीवंत कलाकारांनी आजच्या कलेला, कलाकारांना टाकाऊ म्हटले आहे का? मला त्यांनी कधीही तसे म्हटलेले आठवत नाही. खाजगीत एखाद्यावर टीका करणे किंवा चुका दाखवणे वेगळे आणि सार्वजनिकरित्या कोणाला टाकाऊ म्हणणे वेगळे. संपूर्ण चर्चेचा सूर बघता विषय नीट समजून न घेता बऱ्याच जणांनी उगीचच जुन्या कलाकारांचा मोठेपणा सांगण्याचा बराच आटापिटा केला. वास्तविक तो सिद्ध करायची गरजच नाही. त्यांचा मोठेपणा मलाही मान्य आहेच. आशाबाईंची अनेक गाणी मला खूप खूप आवडतात. पण म्हणून त्यांना कोणाला टाकाऊ म्हणायचा अधिकार नाही, एवढेच माझे म्हणणे आहे. अमिताभला हाकलून लावणारे त्याच्या देदिप्यमान यशाचे स्पष्टीकरण काय देतील? अमिताभवर अजूनही टीका करणारे आहेतच पण त्यामुळे त्याची उंची कमी होत नाही.
आणि जुने जुने काय घेवून बसलात. आजचेही काही वर्षांनी जुनेच होणार आहे. ज्यांना जुन्यालाच कवटाळून बसायचे आहे त्यांनी खुशाल बसावे परंतु नवीन नवीन गाण्यांचा, कवितांचा, संगीताचा आस्वाद ज्यांना घ्यायचा आहे त्यांना सुखाने घेऊ द्यावा. त्यात विरजण पाडू नये. एखादा उदयोन्मुख होतकरू गायक किंवा कलाकार आशाबाईंचे बोल ऐकून नाऊमेद होवू शकतो. त्यांना एवढेच कलेचे येवून पडले आहे तर त्यांनी अशा टाकाऊ (त्यांच्या मते) कलाकारांना "टिकाऊ" कसे करावे याचा विचार करावा, तसे प्रयत्न करावेत. आजचे अनेक कलाकार मेहनतीने समोर आले आहेत. भाईच्या मदतीने जरी काही आले असतील तरी काही तरी अंगात गुण असल्याशिवाय कलाकाराची कला खपत नाही, सर्वमान्य होत नाही. तथाकथित भाई "पृथ्वीराज चव्हाण किंवा नारायण राणेंना" गायला द्या असे म्हणू शकतात का? एखादे गाणे किंवा एखादी कला आपल्याला आवडलीच पाहिजे अशी सक्ती भाई करू शकतात का?
आशाबाईंना काय म्हणायचे होते?, त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय?, त्यांना काय सुचवायचे होते?, त्यांचा अधिकार केवढा मोठा?, त्या योग्य तेच बोलल्या........अशा चिंध्या फाडून काहीही उपयोग नाही. त्या ज्या परिस्थितीत बोलल्या आणि जे बोलल्या ते त्यांच्या उंचीच्या कलाकाराला शोभत नाही. तसे त्यांनी सार्वजनिकरित्या बोलायला नको.