माझी पद्धत म्हणजे आधल्या रात्रीच अगदी आठवणीने डाळ स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात भिजत घालायची. दुसऱ्या दिवशी अशी चांगली भिजलेली डाळ चांगली फुटेपर्यंत बाहेरच शिजवायची. मग चाळणीच्या भांड्यात निथळत ठेवायची. निथळलेल्या डाळीत साखर/गूळ घालून सारखे ढवळून मिश्रण थोडा वेळ तसेच झाकून ठेवून मग विस्तवावर चढवायचे.अशाने कणी फारशी राहात नाही आणि गूळसाखरही लवकर विरघळते. एरवीही कशाहीसाठी साखरेचा अथवा गुळाचा पाक करायचा झाल्यास साखर/गूळ थोड्या पाण्यात आधी भिजत ठेवावे. पाक लवकर होतो. नाही तर कधी कधी सर्व साखर विरघळण्याआधीच पाक घट्ट होऊ लागतो मग पुन्हा पुन्हा पाण्याचा हबका मारत राहावे लागते.डाळ निथळून निघालेले पाणी कटासाठी किंवा अन्यत्रही पदार्थाला दाटपणा येण्यासाठी वापरता येते. मिक्सरच्या चटणी-भांड्यात पुरण छान वाटून निघते. थोडे अधिक वेळा मिक्सरमध्ये घालावे लागते इतकेच. मोठ्या भांड्यात (वेट ग्राइंडरमध्ये) पुरणाच्या वरच्या थरात कणी राहते. सतत मिक्सर थांबवून मिश्रण वरखाली करावे लागते. पुरण थोडे सुके वाटल्यास उकळलेल्या पाण्याचा हबका मारता येतो़. उकळलेले पाणी अशासाठी की त्यामुळे पोळीच्या टिकाऊपणावर परिणाम होत नाही.
लाटलेली पोळी लाटण्याला गुंडाळून तव्यावर अलगद सोडावी आणि लगेच एखाद्या मऊ फडक्याने पोळीवरून जास्तीची पिठी हलकेच झटकावी. पोळीची पोळपाटाची बाजू तव्यावर टाकताना वर आणता आली तर बरे कारण त्या बाजूला पीठ अधिक चिकटलेले असते. ते झटकून काढून निघते. एरवीही पोळी पोळपाटाला थोडी चिकटली असल्यास ती बाजू तव्यावर न पडलेली चांगली. निर्लेपपेक्षा सपाट लोखंडी तव्यावरची पोळी अधिक चांगली लागते असे वैयक्तिक मत आहे. कणकेत मैदा घातल्यास पोळी अधिक मऊ होते. पूर्ण मैद्याचीही पोळी सुंदर होते, फक्त उंडा व्यवस्थित भरावा लागतो नाहीतर लाटताना मैदा एकीकडे सरकून पोळीच्या कडा जाड राहून भाजल्यावर कडक होतात. आमच्याकडे पूर्ण गुळाची पोळी चवीला अधिक आवडते. दिसायलाही छान पिवळी दिसते.