फक्त पुरूषांनाच स्त्रियांबद्दल आकर्षण वाटते असे नाही, तर देखणे पुरूष पाहून स्त्रियानांही त्यांच्याबद्दल आकर्षण वाटते आणि त्या स्त्रिया देखण्या पुरूषांची छेड काढायला प्रवृत्त होतात. कधीकधी हे देखणे पुरूष नीटनेटका पूर्ण पोषाख करणारे, स्त्रियांशी सभ्यतेने वागणारे असे असूनही स्त्रियांच्या छेडछाडीला कसे बळी पडतात, ह्याचे हे उदाहरण पहा.
१५-१६ वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये असतांनाची गोष्ट. आमच्या कॉलेजमध्ये असलेले एक प्रोफेसर दिसायला अतिशय देखणे होते. मी कितीतरी वेळा पाहिलं, की काही विद्यार्थिनी प्रॅक्टीकलच्या वेळी त्यांच्या जवळ उभ्या राहून मुद्दाम त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असत. त्यांनी स्पेसीमेन बघण्यासाठी हातात दिला, की मुद्दाम त्यांच्या हाताला स्पर्श करणं, ते प्रयोग करून दाखवत असतांना त्यांच्या शेजारी उभे राहून त्यांच्या केसांना चोरटे स्पर्श करणं असे प्रकार सर्रास होत असत.
त्याशिवाय मुलींच्या प्रसाधनगृहात त्या प्रोफेसरांबद्दल मुलींच्या "चविष्ट" चर्चाही चालत असत आणि एकदा पुरूष प्रोफेसर्स लॅबमध्ये नसतांना काही स्त्रीप्रोफेसर्सनाही सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रॅक्टीकलच्या वेळी अशा प्रकारे चर्चा करतांना आम्ही पाहिलं आहे. माझ्या मैत्रीणीने त्या स्त्रियांच्या वर्तनाबद्दल नापसंतीही व्यक्त केली होती.
वर उल्लेख केलेले प्रोफेसर कोणा स्त्री प्रोफेसर बरोबर जास्त बोलतांना दिसले, की त्यांचे त्या स्त्री बरोबर अफेअर आहे अशा चर्चाही रंगायच्या.
पुढे सोशल वेबसाईटस आल्या तेव्हा याच प्रोफेसरांच्या एका टिनएज विद्यार्थिनीने त्यांच्या नावाने कम्युनिटी काढली. कम्युनिटीवर लावायला त्यांचा फोटो हवा होता, तो मागणार कोण? त्यांनी स्वतःहून फोटो दिला नाही, तर वर्गात मोबाईलच्या कॅमेराने त्यांचा चोरून फोटो काढायचा असेही या कम्युनिटी डिस्कशनमध्ये एका मुलीने लिहिलेले, मी स्वतः वाचले आहे. पुढे अनंत खटपटी लटपटी करून त्या टीनएज विद्यार्थिनीने त्या प्रोफेसरांचा फोटो मिळवला. नेहमी फुलशर्ट व फुलपँट याच पूर्ण पोषाखात कॉलेजला येणाऱ्या प्रोफेसरांचा एका खाजगी ट्रीपमधला तोकड्या कपड्यातला फोटो त्या मुलीने सोशल वेबसाईटवर टाकला. तिला त्या प्रोफेसरांनी तो फोटो इंटरनेटवर वापरू नकोस असे सांगितल्यानंतरही, काही दिवसांनी ते इंटरनेट वापरत नाहीत असे लक्षात आल्यावर, तिने पुन्हा त्यांच्या फोटोचा इंटरनेटवर गैरवापर चालू केला. अर्थात पुढे या प्रकरणात तिचे हात पोळले गेलेच, पण तिचे लहान वय पाहून तिच्यावर कारवाई न करता तिला फक्त समज देऊन सोडून दिले गेले.