शैली नेहमीप्रमाणे सुंदर. सुरुवातीचे मनोगतही स्मरणरम्यतेविषयीच्या भावना नेमके व्यक्त करणारे.

पण आता हे स्मरणीचे मणी ओढताना एक ड्रॅगिंग सेन्स येतो. फरपट झाल्यासारखे वाटते.

म. टा. मध्ये संपादक म्हणून आल्या आल्या भरतकुमार राऊतांनी (की कुमार केतकरांनी? जाऊ दे. कशाला लक्षात ठेवायचे?)'बदलते खेडे' किंवा अशा काहीशा विषयावर लेखमाला सुरू केली होती. सुरुवातीला तिला चांगला प्रतिसाद लाभला पण नंतर नंतर एकसुरीपणा येऊ लागला.

ह्या लेखसाखळीचेही तसेच होऊ लागले आही की काय असे वाटते. 

आणि गंमत अशी आहे की आता त्या गावात आपले मन रमत नाही अशी कबुली एकीकडे आपण देत असतोच आणि तरीही त्या गावाला एका कालचौकटीत बंदिस्त करून तिथे मात्र रमत असतो.

एक आठवण आहे. (पुन्हा आठवण!) आमच्या ओळखीतले एक गृहस्थ कित्येक वर्षे लंडनमध्ये स्थायिक आहेत. इथे येतात जातात पण रमले मात्र आहेत १९६०-६५ च्या मुंबई-पुण्यात. त्यांच्या मुलीचे लग्न त्यांना मुंबईमध्ये अगदी विधिवत, साग्रसंगीत करायचे होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या भारतातल्या नातेवाईकांना तपशीलवार सूचना दिल्या.त्यांना जेवणाची पंगत हवी होती. तीही पुढे पाट, टेकायला पाट, रांगोळी, अशी. मेनूही पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे त्यांच्या बालपणात लोकप्रिय असलेला असा हवा होता‌. शिवाय कार्यालयही आधुनिक सोयी असलेले तरीही आधल्या रात्री वऱ्हाडी लोकांची एकत्र आणि उत्तम सोय होऊ शकणारे (म्हणजे गाद्या-गिरद्या, उशाशी तांब्या-भांडे वगैरे.) हवे होते. इथल्या लोकांनी जंगजंग पछाडूनही अशी सोय होऊ शकली नाही तेव्हा ते फारच खट्टू झाले.

आपण एखाद्या आसमंतापासून दूर गेलो की आपण आणि तो भवताल एकमेकांसाठी थिजून जातात. एक बेट बनून राहतात. नैसर्गिक वाढीची किंवा बदलाची प्रक्रिया थांबते, थांबवली जाते.

असो. हे काही लेखाचे रसग्रहण नव्हे. हे आहेत काही असेतसे, आडवेतिडवे विचार. लेख बाकी आवडलाच.

जाता जाता : बहुतेक सर्व स्मरणलेखांतून खाण्याविषयीच्या आठवणी अतिशय उत्कट अशा आंतरिक उमाळ्यातून उमटलेल्या दिसतात. माणसाच्या सर्वात रम्य आठवणी ह्या नेहमी जेवणाच्या टेबलाभोवती रेंगाळणाऱ्या असतात असे म्हणतात ते खरेच असावे.