जसजसे वय वाढते तसतसा माणूस सिंहावलोकनात अधिक रमतो. गतायुष्यातील राहून गेलेल्या गोष्टी, बुजवायच्या राहून गेलेल्या फटी, खिंडारे यावर विचार करू लागतो. काय करायला हवे होते म्हणजे काय घडू शकले असते असा आयुष्याचा पट पुन्हा एकदा मांडतो.त्यात आयुष्याने दिलेल्या काही उत्कट क्षणांविषयी कृतज्ञताही असते. स्मरणरंजनात्मक लेख हे एकापरीने या कृतज्ञतेचे प्रकटीकरण असते. तो एक ट्रिब्यूट किंवा सलाम असतो ठोकलेला ज्या स्थळकाळाने आपल्याला समृद्ध केले त्याला. आपण तर्पण हा छान शब्द वापरला आहे. काळाच्या पडद्यावरून अदृश्य झालेल्या पितरांना प्रतीकात्मक तृप्त करावे तसेच हे लेखन असते.
जाता जाता : अशा लेखनाला तात्कालिक रंजनमूल्य असले, किंवा कमी असले तरी दीर्घ काळाने त्याला ऐतिहासिक मूल्य प्राप्त होण्याची शक्यता असते; जर ते कुठेतरी जतन झालेले असले तर.