साळसूदजी, तुमचे प्रश्न :

१) जर स्मृती आरश्यावर पांघरूण घालते तर मूळात स्मृतीचं प्रयोजनच काय?

= स्मृतीचं प्रयोजन रोजचं जगणं सोपं व्हावं, तीच गोष्ट पुन्हापुन्हा आकलनाचा सायास होऊ नाही हे आहे.
स्मृती आरशाचं विस्मरण घडवते याचं कारण फार मजेशीर आहे. मुळात आरसा हे अस्तित्वाचं सर्वात शुद्ध स्वरूप आहे आणि इतर सर्व गोष्टी आरशाची रूपांतरं आहेत. स्मृती हे निकटतम रूपांतर आहे, शरीर हे सघन झालेलं रूपांतरण आहे आणि रूपांतर होऊन देखील आरसा कायम आहे हा आध्यात्माचा महत्तम पैलू आहे; म्हणून मी म्हटलंय आपण आरसा आहोत हा बोध कायम ठेवून स्मृतीचा वापर करणं कौशल्याच आहे.

२) मनुष्येतर प्राणी जरी केवळ "इन्स्टींक्ट" वर जगतात, तरी उदर भरण करताना, झोपताना, स्वसंरक्षण करताना त्यांना त्यांच्या योनीसापेक्ष्य - म्हणजे व्यक्तीसापेक्ष्य हालचाली कराव्या लागतात. वाघ मागे लागला तर हरिण उडायचा प्रयत्न करत नाही, घोडा ट्रायल म्हणून सुद्धा चिकन खात नाही. हे त्यांचे व्यक्तीसापेक्ष्य वर्तन नाही काय?

=  निश्चीतच! आपल्याला देखील इंस्टींक्टीवली जगताना देहाच्या मर्यादातच जगावं लागतं. आरसा ही सर्वसामान्य आणि सर्वांना सर्वकाल प्राप्त असलेली किंबहुना जीच्यापासून आपण वेगळे होऊच शकत नाही अशी अवस्था आहे. भूक लागली की जेवणं, झोप आली की झोपणं इतक्या साध्या गोष्टी सत्य गवसलेली व्यक्ती संपूर्ण निश्चींत होऊन करायला लागते.

पूर्वीच्या आध्यात्मात काय वाटेल ते सांगीतलंय, अमका सदेह वैकुंठाला गेला, तमका पाण्यावरून चालत गेला, हे सर्व अशक्य आहे आणि अशा दाव्यांनी आध्यात्माची हास्यास्पद अवस्था झालीये आणि आपल्या सर्वांची संपूर्ण दिशाभूल झालीये. मला सत्य गवसलंय म्हणून मी एकदम फ्रेंचमध्ये बोलायला लागीन असं नाही, ती भाषा मला शिकायला लागेल. माझ्या देह आणि मनाच्या मर्यादातूनच मी व्यक्त होऊ शकेन.  

३) दुसरं असं कि जर माणसाला प्रत्येक जाणीव स्मृतीतून कळते, वा प्रत्येक जाणीव स्मृती चाळवते तर निराकाराची जाणीव देखील स्मृतीला काहिना काही सिग्नल देत असावी. तो सिग्नल पकडता येतो का?

= तो सिग्नल म्हणजेच तर इंस्टिंक्ट! विचार आणि अंत:प्रेरणा इतकाच तर फरक आहे. जवळजवळ प्रत्येक भोजन आपण वेळ झाली म्हणून करतो, भूकेच्या संवेदनेनी नाही. काय करावं हे आपण बहुदा प्रत्येक वेळी आर्थिक निकष लावून करतो, स्वच्छंदानी नाही.

तुम्हाला आरशाचा बोध होण्याचा अवकाश आहे की विचारांऐवजी अंत:प्रेरणा मार्ग दाखवते मग स्मृतीचा उपयोग रेफरन्सर सारखा होतो; म्हणजे मला पोहायला जायचंय तर सर्वात जवळचा आणि सुरेख स्विमींग पूल कोणता हे स्मृतीतून येतं, तिथे फोन करून वेळ विचारावी यासाठी फोन कुठे लिहिलाय ते स्मृतीतून कळतं.

अंत:प्रेरणेनं जगताना आपण स्मृतीचा उपयोग करतो तिच्या चकव्यात सापडत नाही. पोहायचा मूड आहे आणि स्मृती सांगते ‘ही काय पोहायची वेळ आहे का? काम कोण करणार? असं रोजरोज व्हायला लागलं तर परवडणार का? हा चकवा आहे आणि एकसंध आणि निर्वेध जगणं ही अंत:प्रेरणा आहे.

संजय