तुम्ही म्हटलंय :

>> अंत:प्रेरणा ही अस्तित्वाची इच्छा आहे आणि व्यक्तिगत इच्छा ही आपला स्वत:शी संपर्क न होऊ शकल्यानी...
-- मग हि इंटरलॉक्ड सिचुऍशन झाली... स्वरूपाचा बोध झाल्याबिगर अंतःप्रेरणा आणि इच्छा यातला फरक कळायचा नाही, आणि अंतःप्रेरणा फोलोव न करता स्वरूपाचा बोध व्हायचा नाही. हि कोंडी कशी फोडायची? पहिले लक्ष्य कशावर द्यायचं? आणि कसं?

= मी जे लिहितोयं तो स्वच्छंद म्हणून घ्या, गहन अभ्यास म्हणून नाही, एकदम लाईट मूडमध्ये वाचा.

एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणताही प्रश्न सोडवत नाही आहोत, एका साध्या वस्तुस्थितीची उकल करतोयं. तुम्ही कितीही आणि काहीही प्रश्न विचारले तरी मी सहज उत्तर देऊ शकतो याचं साधं कारण म्हणजे जे आहे तेच मी तुम्हाला सांगतोय.

तुम्ही आध्यात्मिक जार्गनवर जाऊ नका, अवघड शब्दांमुळे आकलन दुर्लभ होतं.

अंत:प्रेरणा म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. आपण अस्तित्वाशी एकरूप आहोतच; अंत:प्रेरणा हा अस्तित्वाचा इशारा आहे, विचारात गुंतल्यामुळे आपल्याला तो लक्षात येत नाही इतकच. आपण अस्तित्वाशी संवाद साधण्या ऐवजी मनाशीच संवाद साधतोय म्हणून कावल्यासारखं होतंय. अंत:प्रेरणेचा उगम नाभी आहे मेंदू नाही.

इच्छा आणि अंत:प्रेरणा यात एक साधा फरक आहे, इच्छा मानसिक असल्यामुळे नेहमी तणाव घेऊन येते, अंत:प्रेरणा साधी सोपी उमज आहे आणि तिची पूर्तता विनासायास आहे. ज्यावेळी प्रयास होतोय हे लक्षात येईल तेव्हा तुम्ही इच्छेच्या मागे आहात आणि जिथे निर्विकल्प, सहज कार्यमग्नता आहे ती अंत:प्रेरणा आहे, मग ते साधं फिरणं असो, स्नान असो, भोजन, झोप, तुमच रोजचं काम असो की तुम्हाला सहज सुचलेलं गाणं असो. अंत:प्रेरणा आणि तृप्ती यात कालांतर भासत नाही.

आता तुमचा प्रश्न:

>स्वरूपाचा बोध झाल्याबिगर अंतःप्रेरणा आणि इच्छा यातला फरक कळायचा नाही आणि अंतःप्रेरणा फॉलो न करता स्वरूपाचा बोध व्हायचा नाही, ही कोंडी कशी फोडायची? पहिले लक्ष्य कशावर द्यायचं? आणि कसं?

= स्वरूप म्हणजे आपण स्वत: याविषयी ठाम राहा कारण ते प्रथम आहे आणि अंत:प्रेरणा हा त्याचा परिणाम आहे.

काय असेल याचं कारण? तर स्वरूप म्हणजे मीच हे समजलं की मग ‘काय करावं’? असा विचार करावा लागत नाही, असा विचार स्मृतीतून येतो आणि तो पुन्हा व्यक्तीमत्वाच्या चकव्यात अडकवतो. स्वरूप म्हणजे आपण स्वत: या बोधासरशी जो निवांतपणा येतो त्यातून आपली जाणीव विचारातून मुक्त होऊन नाभीशी स्थिर होते आणि आपल्याला अस्तित्वाचा इशारा  कळायला लागतो. 

संजय