या पाढ्यांमुळे झोप येऊ शकते, तेव्हा त्यांचे पठण अफूच्या गोळीचा परिणाम देववते, हे बरीक खरे.

सहमत आहे.

पाढ्यांऐवजी अ ते ज्ञ पर्यंतच्या मुळाक्षरांची बाराखडी म्हटली तरी बहुधा कार्ल मार्क्स तिला अफूची गोळी म्हणेल.

हीदेखील शक्यता नाकारता येत नाही, तेव्हा सहमतीकडे कल दर्शवू इच्छितो. (श्री. मार्क्स कशाला काय म्हणतील, हे कोणी सांगावे आणि कशाच्या आधारे ठरवावे, नाही का?)

अर्थात, श्री. मार्क्स यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येण्याचा आमचा मानस नाही, परंतु या निरीक्षणातून काही रोचक शंका उद्भवतात.

- अफू हे एक चटक लावणारे ('ऍडिक्टिव' अशा अर्थी) द्रव्य आहे, असे ऐकले होते. प्रस्तुत पाढ्यांच्या अति किंवा संततपठणाने कोणाला अशा पाढ्यांचे व्यसन लागल्याचे एखादे उदाहरण लिखित अथवा परंपरया मौखिक इतिहासात नमूद असल्याचे इतिहासाच्या कोणा (हौशी अथवा व्यावसायिक) अभ्यासकास ठाऊक असल्यास त्याबद्दल ऐकायला आवडेल, आणि ते रोचक तसेच उद्बोधकही ठरेल याबाबत निदान माझ्या मनात तरी कोणताही किंतु अथवा संदेह नाही. ('शोधा, म्हणजे नक्की सापडेल.')

- किंबहुना, कदाचित या पाढ्यांच्या नेमक्या याच गुणधर्मामुळे ('शाळेच्या पवित्र आवारात व्यसनकारक - पुन्हा, 'ऍडिक्टिव' अशाच अर्थी - द्रव्यांना कोणतेही स्थान असू नये' या 'झीरो-टॉलरन्स'वादी धोरणवजा भूमिकेच्या अतिरेकापोटी) या पाढ्यांची शालेय अभ्यासक्रमातून उचलबांगडी झाली असावी काय?

- संयुक्त अरब अमिरातींत अमली आणि मादक पदार्थविरोधी धोरणाच्या अतिरेकापोटी केवळ अफूच नव्हे, तर प्रवाशांच्या सामानातून खाद्योपयोगासाठी खसखससुद्धा आयात करण्यास बंदी असून, त्या धोरणाची तेथे कडक अंमलबजावणी होत असल्याबद्दल ऐकलेले आहे. ('इस्लामी देशांत एकदा एखादा कायदा केला, की कोणाचीही हयगय किंवा पर्वा न करता त्यांची कडक अंमलबजावणी करतात. आणि शिक्षाही अशा कडक असतात, की कोणी पुन्हा कायदा मोडावयास नि गुन्हे करावयास धजू नये. नाहीतर आम्हीच असे करंटे!') अ ते ज्ञ पर्यंतच्या मुळाक्षरांची बाराखडी आणि (विशेषतः) अकरकी, एकोत्री हे पाढे यासुद्धा अफूच्या गोळ्या आहेत, हे त्या देशातील संबंधित अधिकाऱ्यांच्या ध्यानात आले आहे किंवा कसे, याबद्दल कल्पना नाही. तसे ते (संबंधित अधिकाऱ्यांच्या ध्यानात) आले असल्यास, त्या देशात राहून आपल्या पाल्यांस अ ते ज्ञ पर्यंतची बाराखडी आणि असे (विशेषतः अकरकी, एकोत्री यांसारखे) पाढे यांची दीक्षा देऊन त्यांजकडून ते वारंवार वदवून घेणाऱ्या पालकांकरिता त्या देशाच्या दंडविधानात काय तरतूद असावी, याबद्दल कुतूहल वाटते. तसेच, तसे ते (संबंधित अधिकाऱ्यांच्या ध्यानात) आले नसल्यास, एकदा ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर अशा बाबी हाताळण्याकरिता संअ‌अच्या दंवित कोणते कलम जोडले जाईल, याचे निरीक्षण रोचक ठरावे. (काही ना काही कलम करणाऱ्या कलमांची प्रथा प्रस्तुत देशाच्या दंवित बहुधा नसावी, असे ऐकीव माहितीवरून तरी वाटते, एवढाच काय तो आशेचा किरण आहे - चूभूद्याघ्या.)