रोहिणीताई,
(पीठ) मळणे म्हणजे पाणी/द्रव घालून एकजीव गोळा करणे. (इथे "गोळा" हे सर्वनाम आहे, क्रियापद नव्हे.)
तिंबणे म्हणजे वरील प्रकारे तयार केलेला गोळा (हा जास्त घट्ट असावा लागतो) नंतर त्यावर बुक्क्यांनी (हाताचा बुक्का, गुलालाबरोबर उधळलेला बुक्का नाही ), किंवा तळहाताच्या मनगटाकडच्या भागाने प्रहार (impact) करून त्यागोळ्याचे अधिक एकजीव मिश्रण करणे.
हे माझे निरीक्षण आणि मत आहे.
तिंबण्याच्या क्रियेने पिठाच्या कणांमध्ये पाणी शिरून ते फुगतात. त्यामुळे पदार्थ जास्त फुलतो/फुगतो.
नेहमीच्या पोळ्याची कणिक ही सैलसर असेल आणि नुसती मळून घेतली असेल तर पोळ्या हलक्या आणि मऊ होतात. तशीच पुरणपोळ्यांची सुद्धा. पुरणपोळ्यांच्या कणकेमध्ये मोहन (तेल) जास्त घालावे लागते.
माझ्या सुगरण पत्नीने केलेल्या साध्या आणि पुरणपोळ्या ह्या अतिशय चांगल्या होतात, त्यामुळे मी स्वतः पोळ्या करण्याच्या भानगडीत पडत नाही. तिने केलेल्या पोळ्यांसारख्या पोळ्या मी क्वचितच खाल्ल्या आहेत.
आपल्याकडे करंज्या करायचे पीठ खलबत्त्यात घालून कुटतात हे तुम्हाला महिती असेलच. त्याचे कारण तेच. पुऱ्यांची कणिक सुद्धा घट्ट भिजवून ती चांगली तिंबली की पुऱ्या छान फुगतात. माझ्या सासुबाई मुद्दाम मला पुऱ्यांची कणिक तिंबायला सांगत.
ब्रेड करताना पीठ मळतात, पण पिझ्झा करताना तेच पीठ तिंबतात. तुम्ही पिझ्झा करताना केलेली जाड पोळी वर उडवून झेललेली पाहिली असेल. त्याचा उद्देशहि तसाच म्हणजे पीठावर प्रहार करण्याचा असतो.
कलोअ,
सुभाष