"प्रशांत विश्वास यशवंत अनंत बळवंत दांडेकर" उर्फ दांड्या. साडेचार फूट उंच आणि जेमतेम वीस वर्षाचा अनुभव असणार छोटंसं व्यक्तिमत्त्व. आमच्या गल्लीमध्ये "दांडू" ह्या नावानं जगप्रसिद्ध !
खांद्यावर नेहमी टी-शर्ट (बऱ्याचदा नसलेले बायसेप दाखवायला स्लीव्ह्स नसलेला) आणि खाली जीन ची पेन्ट.
कॉफी ला सगळे बाहेर पडलो की बऱ्याचदा, उगाच माज म्हणून दांड्या मुद्दाम स्लीवलेस टी-शर्ट आणि अर्ध्या विजारीमध्ये येणार. आणि तिकडे गेल्यावर आपण अगदी त्या दुकानदाराचे जावई असल्यासारखे वागणार. मग ते दुर्गा असो किंवा मेक डी.
कुठे घराच्या बाहेर पडायचं झालं की ह्यांची एम ८० मेजर वरूनच स्वारी निघणार.
मेजर ला आपण काही नावं ठेवली तर हा त्या गाडीचा नव्हे तर तिच्या मालकाचा अपमान समाजाला जातो. त्यामागेही योग्य कारणे आहेत म्हणा. ट्रेक ला गेल्यावर आमच्या भल्या भल्या "भरीतल्या" अपाचे, पल्सर सारख्या बाइक पंक्चर होतील, त्रास देतील. पण मेजर मात्र तिच्या कामात कधीच दिरंगाई - कुचारांगाई करणार नाही.
ट्रांस आणि तो पण ATB चा असेल तर मग ह्याला बाकी काही करमणूक नसेल तरी चालेल. इयरफोन चं ह्याला भारी कौतुक आणि वेड. ते एकदा कानात टाकले की हा गेलाच दुसऱ्या जगात.
काही प्रमाणात, आपले प्रत्येकाचेच स्वतः:चे असे नियम किंवा तत्त्व असतात. ही तत्त्वे समोर धरून आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी, समाजाशी जुळवून घेत असतो.
मग तो चार-चौघात पाळायचा शिष्टाचार असेल, किंवा प्रवाहाविरुद्ध जाऊन बोलण्याचे धाडस होत नाही, म्हणून "हो ला हो " म्हणणे असेल.
काही प्रमाणात का होईना, प्रत्येक जण हे नियम पळत असतो.
पण दांड्या ह्या सर्वांपासून वेगळा आहे. त्यानं स्वतः:च्या वाटचालीसाठी एक वेगळाच मार्ग तयार करून ठेवला आहे. काहीही होवो, तो आपल्या धोपटमार्गावरून हटणारा नाही.
त्याला जे पटतं त्या गोष्टीची तो नेहमीच साथ देतो. अगदी ती गोष्ट चुकीची असो व नसो. जर चुकीचा ठरला, तर सगळ्यांच्या शिव्या शाप खायला पण हा निधड्या छातीनं उभा.
पण एकदा ती गोष्ट त्याला पटली की ती कायमचीच. परत त्यावर त्याचं दुमत झालेलं मला आठवत नाही.
इतर लोक नाटकं करतात हे समजते ह्याला. पण त्याचा स्वभाव च असा आहे की तो घेतो स्वतः:ला adjust करून समोरच्या नुसार. त्यानं स्वतः:नि नाटकं केली तर ती कोणी खपवून घेत नाही हे पण त्याला माहीत आहे.
घरातील सर्वात लहान व्यक्ती हीच. आणि अजूनही इंटरनेट, मित्र, कॉफी, हिंडणे, फिरणे आणि अश्या अनेक तत्सम गोष्टींचा आस्वाद घेण्यामध्ये मग्न असल्यानं एकंदर घरातल्या जबाबदारीची जाणीव कमीच.
घरातून बाहेर पडताना आपण कुठे चाललो आहोत हे सांगायची तसदी ह्यानं कधी घेतली असेल असं आठवत नाही. ह्याला पुरावा म्हणजे त्याच्या आई-बाबांचे मला आणि इतर मित्रांना "प्रशांत तुमच्याबरोबर आहे का ?" असे विचारणारे फोन.
कोणतेही काम जर पटले तर अगदी निस्वार्थीपणे आणि तन्मयतेने करणारा हा इसम. मग ते संघाचे काम असो किंवा कोणत्या मित्राला करत असलेली मदत असो.
"दिवसभर शाखेची काम करत गावभर हिंडत असतो. अभ्यासाच्या नावानं शंख. आता तुमचा संघ काय त्याचं पोट भरणार आहे का ?" - इति प्रशांत च्या मातोश्री.
"होईल हो काकू .. काही काळजी करू नका. चांगलं काम करतोय तो. आणि आमचं लक्ष असतं त्याच्याकडे." आम्ही अशी सारवासारव करून पलायन करायच्या बेतात म्हणतो.
"तुम्ही आहात म्हणून तर आम्ही निर्धास्त पाठवतो त्याला" असं म्हणून नकळतच आमच्या खांद्यावर जबाबदारी पडते.
खरंतर ह्याचा स्वभाव अतिशय भोळा. आपण दुसऱ्याला मदत करतोय की दुसरा आपला वापर करून घेत आहे ह्याच्यातला फरक न जाणणारा किंवा त्याला तो फरक जाणूनच घ्यायचा नाही असं म्हणालो तर अयोग्य ठरणार नाही.
"दांड्या, आज जरा ऑफिस ला सोड ना, गाडी सर्विसिंग ला टाकलीये.", "अरे ते जरा डॉक्युमेंट्स स्कॅन कर आणि सेंड कर ना मला", इथपासून ते अगदी "दांड्या, बऱ्याच दिवसात तू पार्टी दिली नाहीयेस. आज कोल्ड हवीचे आम्हाला" इथपर्यंत, सगळे जण त्याचा मस्त उपयोग करून घेत असतात.
त्याचा सगळ्यात ब्येष्ट फ़्रेंड म्हणाल तर तो "गुगल" आहे. गुगल साठी पेठेमधले असंख्य map भरून दिले आहेत त्यानं. त्याबद्दल गुगल नि दोन लाकडी, कोरीव अश्या प्रकारची अतिशय सुंदर certificates त्याला California मधून पाठवली आहेत.
वेळेचं अतिशय काटेकोरपणे पालन करणारा हा दांड्या. ट्रेक म्हणा, किंवा शाखेचा उत्सव म्हणा, सर्व गोष्टी प्लॅनिंगनेच करणार. तरीपण आयत्या वेळेस थोडाफार मागे पुढे होतंच. पण आम्ही पण "ठीके, चालायचंच" असं म्हणून विषय सोडून देतो. तो त्यातून काहीतरी शिकला हे आमच्यासाठी पुरेसं असतं.
अभ्यासाच्या नावानं म्हणाल तर ठो ठो च आहे. BCA ला दोन गटांगळ्या खाल्ल्या आहेत. तरीसुद्धा प्रयत्न चालू आहेत त्याचे. आमच्या परीनं आम्ही मदत करायचा पुरेपूर प्रयत्न करत असतो.
"त्या गुगल ला सांगा, certificates च्या ऐवजी BCA ची डिग्री द्यायला " असं असंख्य वेळेस आई आणि बाबांकडून आम्हाला ऐकायला मिळालं आहे.
अभ्यासाव्यतिरिक्त काही कामे घेत असतो घराच्या घरी. स्टीकर बनवून दे, पुस्तकाचे कव्हर करून दे, कोणाला वेब साईट तयार करून दे. त्याची धडपड खरंच वाखाणण्याजोगी आहे.
काहीही असला तरी एक विश्वास वाटतो की दांड्या खूप वेगळा आहे. पुढे नक्की काहीतरी करून दाखवणार. त्याचे इरादे अतिशय प्रामाणिक आहेत.
दांड्या, तू आमचा मित्र आहेस ह्याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे. आम्हा सर्वांचा तू लाडका आहेस. प्रचंड मोठं यश तुझी वाट बघत आहे. झपाझप पावले टाक आणि त्याला ताब्यात घे.
तुला पुढील वाटचालीसाठी लै लै शुभेच्छा !
(हे आर्टिकल तुला आमच्याकडून वाढदिवसाची भेट !)
-भूक, साने बंधू, निऱ्या, सुमंत, आशु, चंद्र, पुष्कर, केदार, मनिष