डिस्नी आपले (मुळातले इंग्रजी) कार्यक्रम भयानक आघातातल्या मराठीतील भयानक भाषांतरातल्या डबिंगसहित सादर करणार, यास 'मराठीसाठी काही करणे' म्हणता येईल काय? यात फायदा कोणाचा, मराठीचा की डिस्नीचा? डिस्नीचे कार्यक्रम जे इंग्रजीतून पाहू शकले नसते (किंवा ज्यांनी पाहिले नसते) अशा आणखी लक्षावधी मराठीभाषक (किंवा मराठी जाणणाऱ्या) प्रेक्षकांपर्यंत ते कार्यक्रम आता मराठीतून पोहोचणार, यात डिस्नीचा (आणि त्या कार्यक्रमांच्या जाहिरातदार पाठीराख्यांचा - स्पॉन्सर्सचा) फायदा निश्चित. पण यात मराठीचे संरक्षण आणि/किंवा संवर्धन नेमके कसे होते?

हाच निकष लावायचा झाला, तर पूर्वी सोविएत संघ अस्तित्वात असताना त्यांचे 'रेडियो मॉस्को' हे केंद्र भारतातून लघुलहरी पट्ट्यांमध्ये काटा कोठेही फिरवा, लागायचे. अगदी खणखणीत लागायचे. त्यावर अनेक भारतीय आणि इतर जागतिक भाषांतून प्रक्षेपणे होत. त्यात दररोज अर्ध्या तासाचा किमान एक कालावधी मराठीतून प्रसारणासाठी नेमलेला असे. दररोज अर्धा तास अस्खलित मराठीतून खणखणीत आवाजात सोविएत संघाविषयी 'माहिती' आणि तत्सम सोविएत प्रचार ऐकायला मिळे. तसेच, भारतातील सोविएत वकिलात मराठीतून 'माहिती' आणि तत्सम प्रचारासाठी 'सोविएत देश' नामक एक मराठी नियतकालिक प्रसिद्ध आणि (बहुधा फुकटात) वितरित करीत असे. (त्याच धर्तीवर, फार्फार पूर्वी भारतातील (बहुधा) अमेरिकन वकिलातसुद्धा 'अमेरिकन वार्ताहर' की कायसेसे मराठी नियतकालिक प्रसिद्ध करत असल्याबद्दल ऐकलेले आहे.)

आता 'रेडियो मॉस्को' काय किंवा भारतातील सोविएत (किंवा अमेरिकन) वकिलात काय, यांनी 'मराठीसाठी काही केले' असे म्हणता येईल काय?