रिक्षावाल्यांची बाजू समजून घेऊन त्यांचा विचार करून त्यांचं हृदयपरिवर्तन वगैरे घडवून आणणं हा एक फूलटाईम धंदा होऊ शकेल. त्याला हिंदी मिडियाचा उत्तम पाठिंबा मिळेल. सभांवर सभा होतील. रिक्षावाल्यांचा माज आणखी वाढेल. पण त्याला माज म्हणता येणार नाही. कारण ती त्यांची बाजू आहे आणि त्यांच्या दृष्टीनं ती बरोबर आहे. गिऱ्हाईकाला रिक्षावाल्याला विचारताना, ''साहेब अमूक अमूक ठिकाणी यायची आपली इच्छा आहे का'' या अदबीनं विचारावं लागेल. त्यावर रिक्षावाल्यांनी "चल रे मला टाईम नाही" असं उत्तर दिल्यास, "हो रे बाबा, खरं आहे. किती दमतोस रे तू" असं गिऱ्हाईकानी म्हणायला हवं.
आपल्या देशात वरील गोष्टी सहज शक्य आहेत. सामान्य माणूस हा सगळ्यांचं ऐकण्यासाठीच जन्माला आलेला आहे हा आपल्या देशातील अलिखित नियम आहे. एकच रिक्षा अनेक चालक एकाच लायसन्स वर चालवतात हे आपल्याला माहिती आहे का? यामागे त्यांची नक्की कोणती बाजू आहे? ती आपण समजून घ्यायला हवी असं आपल्याला म्हणायचं आहे का? ती बाजू समजून घेऊन त्यांना आर टी ओ कडे नेऊन लायसन्स मिळवून देणं हे देखील गिऱ्हाईकानं करावं अशी अपेक्षा आहे का?
वास्तवीक समस्त रिक्षेवाल्यांना अतिशय कडक शब्दात समज देणे आवश्यक आहे. त्याचा उपयोग नं झाल्यास चांगला सणसणीत दंड वसूल केला पाहिजे. त्याचाही उपयोग नं झाल्यास संबंधीत रिक्षावाल्याचं लायसन्स जप्त करून त्याची रिक्षा काढून घेतली पाहिजे. माझी खात्री आहे की अशी शिक्षा केल्यास रिक्षावाल्यांना थोडीतरी जरब नक्कीच बसेल आणि त्यांचा माज बऱ्याच प्रमाणात उतरेल.