>आपले लेख नेहमी वाचतो, शब्दानं शब्द वाचून पण बऱ्याचदा उमजत नाही. शून्याची/शून्य स्थितीची जाणीव प्रयत्न करूनही काही होत नाही. पण प्रयत्न चालू आहेत.
= शब्दांनी मी तुम्हाला एका लाइट मूडमध्ये आणायचा प्रयत्न करतो, त्या मूडमध्ये तुम्हाला अचानक, समोर असलेला निराकार दिसेल किंवा कधीही भंग न पावणारी शांतता जाणवेल किंवा अंगोपांग एक हलकेपणा जाणवेल किंवा मनाची बडबड थांबली तर आत कुणीही नाही हा उलगडा होईल! ही सगळी शून्याची किंवा सत्याची रूपं आहेत.
>माझ्या आयुष्याचा अर्थ काय? हा प्रश्न जेव्हा "मी" स्वतःला विचारतो, तेव्हा अमकं-तमकं करण्यासाठी माझा जन्म झाला आहे अशी मीच स्वतःची खूणगाठ बांधून घेतो. (किंवा कदाचित तशी माझीच स्वतःला खात्री पटते) पण हे अमकं-तमकं करणं हे शिवधनुष्य पेलवण्याइतपत कठिण वाटतं.
= आपला जन्म काही ठराविक कामासाठी झालायं हा समजच व्यक्तीमत्व निर्माण करतो आणि आपण एकांगी होतो.
व्यक्ती आहोत असं वाटणं हाच बंदिवास आहे, तेच बंधन आहे. जगण्याची खरी मजा तेव्हा आहे ज्यावेळी तुम्हाला कळतं की आपण शरीर आणि मनापासून वेगळे आहोत. काय असेल याचं कारण? जस्ट इमॅजीन! कोणत्याही कृत्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही म्हटल्यावर जो स्वच्छंद गवसतो, जी सृजनात्मकता येते, त्यातून तुम्हाला स्वविकासाचे अनेकानेक पर्याय उपलब्ध होतात.
पाश्चिमात्य आणि पौर्वात्य विचारसरणीत हाच महत्त्वाचा फरक आहे आपण कुणाच्या विरूद्ध किंवा कुठल्या असामान्य गोष्टीसाठी झटत नाही, निसर्गाशी तादात्म्य साधून अत्यंत मजेत जगायला लागतो.
>"असाध्यम साधय" वा "impossible is nothing" असं म्हणणं सोपं आहे. पण त्यासाठी प्रयत्न, चिकाटी अन, "आत्मविश्वास" असणं गरजेचं आहे असं म्हणतात. त्यापैकी प्रयत्न तर सगळेच करतात, चिकाटीही बरेचजण दाखवतात, पण आत्मविश्वास फार कमी जणांकडे असतो. अलीकडेच एक आत्मविश्वास प्रशिक्षण क्रम (कोर्स) केला. त्याचा किती फायदा झाला हे माहीत नाही.
= आत्मविश्वास असामान्य कौशल्यावर अवलंबून नाही, आपण आत्मा आहोत आणि प्रसंगानी किंवा कृत्यानी अनाबाधीत आहोत हा उलगडा आहे.
सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे आत्मविश्वास नाही, सेल्फ रियलायजेशन तुम्हाला आत्मविश्वास देईल, स्वास्थ्य देईल.
>मला नेहमीच एक प्रश्न पडायचा आणि अजूनही पडतो, ज्या यशस्वी लोकांची उदाहरणं दिली गेली वा नेहमी दिली जातात त्यांचा आत्मविश्वास कदाचित प्रबळ असू शकतो. पण त्याचा "अहंकार" लोप झालेला असतो का? त्यातल्या काही व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यातलं असाध्य साध्य केलेलं असतं (बहुदा). ह्या स्थितीला जाऊन पण नंतर आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो का (पुढील वाटचालीत)?
= त्यांना तो सतत टिकवून ठेवावा लागतो आणि त्यामुळे त्यांना प्रचंड अस्वस्थता कायम जाणवत असते याचं साधं कारण म्हणजे अस्तित्वात सतत बदल घडत असतात जे कुणी अठराव्या वर्षी केलंय ते त्याच्या हयातीतच कुणी तरी आठव्या वर्षीच करून दाखवतो.
चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा इतिहासात अजरामर होतो पण व्यक्तिगत जीवनात तसाच राहतो. वार्धक्याचा सामना त्याला गतस्मृतीच्या आधारे करावा लागतो आणि ते अशक्य आहे कारण जोपर्यंत आपण मरत नाही हा उलगडा होत नाही तोपर्यंत स्वास्थ्य येऊच शकत नाही.
>त्यांना वैश्विक सत्य उलगडलेलं असतं का? पैसा आणि प्रसिद्धी ह्याच दोन परिमाणांनी यशापयशाचं मोजमाप करणं योग्य की अयोग्य?
= त्यांना सत्य उलगडलेलं नसतं कारण प्रकट जीवनातलं कर्तृत्वच त्यांच्यासाठी महत्त्वाचं झालेलं असतं.
आपल्या यशाचं सार्थक संपत्ती आणि प्रसिद्धीनं होईल की स्वरूपाचा उलगडा झाल्यानं हा निर्णय तुम्हाला घेता यावा म्हणून तर मी लिहीतोयं!
> अयोग्य असेलही, पण वैश्विक सत्य उलगडून पण, दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असेल, अगदी तसंच नाही, पण समजा आर्थिक स्थिती बेताची/खालावलेली असेल, वा असाध्य साध्य करता येऊ शकलं नसेल, तर त्या वैश्विक सत्य समजण्याचा काय फायदा?
= सत्य उलगडण्याचा आणि निर्धन होण्याचा काही संबंधच नाही. तुम्ही इतके कमालीचे वर्तमानात जगता की तुमचे निर्णय चुकणं दुरापास्त होतं. तुमचं अस्तित्वाशी असं काही साधर्म्य साधतं की विपत्ती काय की विकलांगता काय कोणताही प्रसंग उद्भवला तरी तुम्ही हर क्षणी मजेत जगता.
संजय