>काही माणसाना - अकाली मरण ( आजाराने) वा अपघाताने वा येते. याची काय कारणे असावीत? जर निराकार एकच आहे तर वेगवेगळ्या देहांचे वेगवेगळे भोग का? धन्यवाद. जर ते पूर्वनियोजित असतिल तर माणसाच्या हातात काय आहे?

= निराकार एक आहे त्याला पुरुष म्हटलंय, आध्यात्म हा त्या पुरुषाचा शोध आहे किंवा आपण मुळात तो पुरुष आहोत याचा उलगडा आहे. पुरुष सदैव अव्यक्त आहे आणि त्याच्या प्रकटीकरणाला प्रकृती म्हटलंय. पुरुष प्रकृतीला नियंत्रित करत नाही, प्रकृती स्वयेच प्रकट होते आणि पुन्हा पुरुषात लीन होते, लयाला जाते.

प्रकृतीचं प्रकटीकरण, चलन आणि लय दोन अर्थांनी रहस्यमय आहे. एक, प्रकृतीचे सर्व घटक कॅलिडोस्कोपसारखे एकमेकांशी निगडीत आहेत त्यामुळे जसं कॅलिडोस्कोप कोणत्या वेळी काय रूपरंग घेईल ते सांगणं अशक्य आहे आणि तो सर्व उलगडा होण्यापूर्वीच तो दुसरं रंगरूप घेतो तश्या प्रकृतीच्या लिला अगम्य आहेत त्यामुळे कोणता आकार कसा, केव्हा तयार होईल आणि लयाला जाईल याचं विश्लेषण (काही माणसाना - अकाली मरण ( आजाराने) वा अपघाताने वा येते, वेगवेगळ्या देहांचे वेगवेगळे भोग का? ) करणं असंभव आहे आणि आध्यात्म  अस्तित्वाचा त्या अंगानी वेध घेत नाही. आध्यात्म जे अपरिवर्तनीय आहे (पुरुष) त्याचा शोध आहे.

याला दुसरं परिमाण असं देखील आहे की पुरुष निराकार असल्यानी अनिर्बंध आहे म्हणजे तुम्ही अवकाशात कोणत्याही दिशेला आणि कितीही दूर गेलात तरी तुम्हाला अंत मिळणार नाही म्हणून पुरुष सुद्धा एक रहस्य आहे.

थोडक्यात तुम्ही प्रकृतीच्या काही कार्यकारणांचा शोध लावू शकता (उदा. गुरूत्वाकर्षण) पण समग्र कार्यकारणांचा वेध असंभव आहे. जगातलं सर्व विज्ञान हा कार्यकारण भावाचा शोध आहे आणि आध्यात्म रहस्यमयतेत रमणं आहे.

>जर ते पूर्वनियोजित असतिल तर माणसाच्या हातात काय आहे?

= इथे सर्वच (म्हणजे पुरुष आणि त्याचं प्रकटीकरण) रहस्यमय आहे पण ते पूर्वनियोजित नाही कारण नियोजन करणारा कुणीही नाही; बुद्ध त्यामुळे निराकाराला शून्य म्हणतो.

माणसाच्या हातात फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे या सर्व प्रकटीकरणातल्या अपरिवर्तनीय तत्वाचा शोध, पुरुषाचा शोध आणि तेच आपलं स्वरूप आहे हा उलगडा. हा उलगडा एकदा झाला की दोन गोष्टी होतात; एक, तुम्ही अस्तित्वाची रहस्यमयता जाणून प्रासंगिक विश्लेषणातून मुक्त होता आणि दोन, प्रसंगांचा किंवा घटनांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही हे कळल्यानं मजेत जगायला लागता.

संजय