>पाठींबा असणे आणि नसणे ह्याचा परीणाम कार्यालयीन काम करताना घेतला आहे. जेंव्हा पाठींबा होता, तेंव्हा आत्मविश्वास खुप होता आणि काम करताना आनंद वाटत होता. जेंव्हा काही कारणांनी (कार्यालयीन पोलिटिक्स) पाठींबा काढून मुद्दाम त्रास देणे सुरू झाले तेंव्हा आत्मविश्वासावर खुप ऋण परीणाम झाला. अशा वेळेस, जेंव्हा परिस्थिती आपल्या विरोधात आहे, तेंव्हा आत्मविश्वास कसा परत मिळवावा? कारण तिथे टिकून राहणे अत्यावश्यक असते.

आपला आत्मविश्वास दुसऱ्यावर अवलंबून नसणे कसे साध्य करायचे?

= पहिली गोष्ट, मी ज्याला आत्मविश्वास म्हणतो, तो ‘मी आत्मा आहे’ हा उलगडा आहे, सायकॉलॉजीत ज्याला कॉंन्फिडन्स म्हणतात, तो कॉंन्फिडन्स, मी म्हणतो त्या आत्मविश्वासाची उपपत्ती आहे; इट वील फॉलो.

समाजमान्य ‘कॉन्फिडन्स’ हा असामान्य कौशल्य आणि त्याला इतरांनी दिलेली मान्यता यावर अवलंबून आहे त्यामुळे तो दोलायमान आहे. माझा आत्मविश्वास कशावरही अवलंबून नाही.

जगताना तुम्हाला दोन्ही गोष्टी लागतात, आत्मविश्वास आणि कार्यकौशल्य तरच तुम्ही टिकू शकता, म्हणजे मला बोध आहे पण भाषेवर प्रभुत्व नसेल, इंटरनेट, कंप्युटर, विविध आध्यात्मिक प्रणाली, मानसशास्त्र यांचं ज्ञान नसेल तर माझा बोध मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकणार नाही.

याला दुसराही महत्वाचा पैलू आहे मला इतर सर्व कौशल्य अवगत असली आणि बोध नसेल तर मी जनमान्यतेवर हिंदकळत राहीन कारण मलाच बोध नाही तर मी तुम्हाला काय सांगणार? अंतरजालासारख्या कमालीच्या एक्सपोज्ड माध्यमावर जगातल्या कुणाच्याही कोणत्याही प्रश्नाला मला कसं उत्तर देता येईल?

त्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टी अवगत केल्याशिवाय तुम्हाला पूर्ण स्वास्थ्य येऊ शकत नाही, एक, मी लिहीतोयं त्या निराकाराचा बोध (आत्मविश्वास) आणि मग, दोन, तुम्ही रोज करत असलेल्या कार्यात कौशल्य (कॉंन्फिडन्स).  

पण एक गोष्ट मी तुम्हाला नि:संदेहपणे सांगतो की एकदा तुम्हाला आत्मविश्वास आला की कार्याकौशल्य येणं अत्यंत सहज आणि सोपं आहे. हे एकदा झालं की मग कुणाच्या पाठिंब्याची आणि सहमतीची गरज नाही, तुम्ही कायमचे निश्चिंत व्हाल.

संजय