> आपणा सर्वांमधील मी हा सर्वांसाठी एकच असेल, तर आपणापैकी प्रत्येकाला आपला मी वेगळा आहे असे का वाटते?

= कारण आपण स्वत:ला व्यक्ती समजतो.

> कित्येक सिद्ध पुरुष या खऱ्या मी ला जाणू लागले. म्हणजे निराकाराला निराकाराची जाणीव झाली. मग मला त्याची जाणीव आपोआप का नाही होत?

= सर्व नाती ही आपली मान्यता आहे हे आपल्याला पटतं का? ती धारणा जशी पक्की आहे त्यापेक्षाही मी व्यक्ती आहे ही धारणा दृढ आहे कारण अशा असंख्य धारणांचा तो एकत्रित परिणाम आहे.

सत्य गवसणं किंवा आपण निराकार आहोत हा बोध होणं आपोआप होत नाही कारण आपण रोजच्या धकाधकीत व्यस्त आहोत, जी सत्याची स्थिती आहे, ‘अविचल’ ती त्यामुळे आपल्याला जाणवतच नाही. ‘आपण कधीही आणि कुठेही जात नाही’ असं मी म्हटलं तर तुम्हाला ते मंजूरच होणार नाही. आपण स्वतःला 'अविचल' असून 'चल' मानतोयं, आपली धारणा त्या बोधापासून आपल्याला वंचित ठेवतेयं. 

>सिद्ध पुरुषाची ती जाणीव त्याच्या मर्त्य शरीराला का बांधलेली आहे? ही निराकाराची होणारी जाणीव हा या शरीरातल्या मी ला होणारा भास आहे असे नाही का म्हणता येणार?

= ‘मी’ शरीरबद्ध नाहीये, शरीरातून ‘मी’चा वेध घेतल्यामुळे तसं वाटतंय. आपण स्वत:ला शरीर समजतोयं पण आपण शरीर झालेलो नाही.

तुम्ही एक साधा प्रयोग आता करून पाहा. आहात तिथे ऊठून उभे राहा आणि रूममध्ये येरझारा घालायला लागा, तुमच्या लक्षात येईल की आपण चालत नाहीये, शरीर चालतंय आणि आपल्याला समजतंय.

हा ‘निराकार मीचा’ किंवा स्वत:चा बोध जर तुम्ही निद्रेतही कायम ठेवू शकलात तर तुम्हाला कळेल की शरीर झोपलंय पण आपण जागे आहोत.  

>सिद्धपुरुषाच्या शरीराला कोणी इजा केली की त्याला वेदना होतील. (म्हणजे मेंदूला जाणवतील). तश्याच दुसऱ्या कोणाच्यातरी मेंदूला जाणवलेल्या वेदना या सिद्ध पुरुषाला का समजत नाहीत?

= मेंदूला जाणवत नाही, मेंदूमार्फत आपल्याला (किंवा ‘मी’ला) जाणवतं. समजा तुम्ही नायगरा बघतायं आणि मी इथे पुण्यात आहे तर तुमचा आणि माझा मी जरी एक असेल तरी मला नायगरा कसा दिसेल? कारण ज्या माध्यमातून (डोळे) तो दिसाणार त्या माध्यमासमोर ते दृष्य नाहीये. त्याच प्रमाणे जर एखाद्याचा पाय फ्रॅक्चर झाला तर माझ्या आणि त्याच्या ‘मी’ त अंतर नसलं तरी मेंदूत आहे त्यामुळे त्याच्या मेंदूमार्फत ती जाणीव त्यालाच होईल.

>हा सनातन मी जर अबाधित आणि एकच आहे, तर शरीराला मी समजणारा कोण आहे?

= शरीराला मी समजणारा 'मी' आपल्या सर्वांचा एकच आहे. एखाद्या व्यक्तीत तो अजून त्याच भ्रमात आहे आणि एखाद्यात तो त्या भ्रमातून जागा झाला आहे.

> निराकार जर सर्वाच्या पलीकडे आहे, तर हा देहाच्या बाहेर त्याचे अस्तित्व का नाही जाणवत?

= निराकार सर्व प्रकटीकरणाच्या बाहेर आहे आणि त्याच्यामुळे देह जाणवतोयं

>एखाद्या खुर्ची टेबलाला, किंवा मेलेल्या शरीराला बोध का नाही होत? त्यासाठी मनुष्याचे जिवंत शरीरच का लागते?

= टेबलाला बोध होऊ शकत नाही कारण टेबलात जाणीवेनं जाणीवेला जाणण्याची क्षमता नाही.

हा सुरेख प्रश्न आहे, म्हणून थोडं सविस्तर लिहीतो:

सर्व प्रकटीकरण हे निराकाराचंच रूपांतरण आहे आणि निराकार निर्जीव नाही त्यामुळे दगड ही अत्यंत सघन झालेली जाणीव, झाड ही संवेदनाक्षम जाणीव, देह ही सर्वात संवेदनाक्षम जाणीव आणि खुद्द आपण म्हणजे निराकार जाणीव.

प्रत्येक जाणीवेचा स्तर त्याच्या अलिकडचा स्तर जाणू शकतो त्यामुळे दगड काहीही जाणू शकत नाही, झाड स्वत:ला जगवण्यासाठी जे लागतं ते जाणू शकतं, शरीर स्वत:ला टिकवण्यासाठी जे जे लागतं ते (मेंदूमार्फत) जाणू शकतं आणि आपल्यामागे काहीही नाही त्यामुळे आपण स्वत:ला, या ‘निराकार मी’ला जाणू शकतो.    

 >म्हणजे पुन्हा या सर्वाला आपले शरीर आणि मेंदूद्वारे होणाऱ्या संवेदना या बाहेर काही स्थान आहे का? (आपल्या अस्तित्वाची जाणीव ही कुठेतरी मेंदू, न्यूरॉन्स च्या पलीकडली आहे असे मला वाटतेच, पण मेंदू आणि न्यूरॉन्स च्या बाहेर कोणाला ही जाणीव असल्याचे कळलेले नाही.

= जर डोळ्यांना दिसत असतं तर अंध व्यक्तीला आपल्याला दिसत नाही हे कसं कळलं असतं?  ज्याला दृष्याचा बोध होतोयं तो त्या प्रक्रियेहून वेगळा हवा. ज्याला सर्व देहाचा बोध होतो तो विदेह हवा, त्यामुळेच तर तो देहातली प्रत्येक घटना जाणून सर्व घटनांपेक्षा वेगळा असतो. जेव्हा देह लयाला जाईल तेव्हा देहाचं लयाला जाणं देखील हा विदेह जाणेल आपण फक्त त्याच्याशी (किंवा स्वतःशी) संलग्न हवं!

संजय