मला दिव्यदृष्टी वगैरे काही नाही आणि हा माझा विनम्रपणा देखील नाही.


एक साधी गोष्ट आहे, आपण व्यक्तीनसून सत्य आहोत, बास! यापलिकडे मी काही एक लिहीत नाही. माझं सर्व लेखन फक्त या एका गोष्टीचा उलगडा आहे. आय एम रिपोर्टींग जस्ट अ फॅक्ट! म्हणून तर मी इतकं बिनधास्त लिहीतो.

आपल्या सर्व शंकांचं एकच कारण आहे की आपल्याला लाख वाटतंय की आपण सत्य आहोत पण आपल्या मनाला आपण निरूत्तर करू शकत नाही.

मनाला निरूत्तर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्हाला आपण सत्य आहोत याची झालेली खात्री. एकदा तुमची खात्री पटली की मन निरूत्तर होतं पण आपण मनानी आपल्या खात्रीवर शिक्कामोर्तब करावं या आशेवर आहोत.

मन, विचार, धारणा, भावना किंवा गैरसमज हे निराकाराचंच म्हणजे आपलंच सूक्ष्मतम रूपांतर आहे. मनाशी लढायला आपल्याला मनाच्या पातळीवर यायला लागतं म्हणजे आपण स्थितीपासून दूरावतो, आपल्याला स्वतःच विस्मरण होतं मग त्या विस्मरणात मन आपल्याला नवनवीन विचार, कल्पना आणि अपेक्षात घेऊन जातं त्यामुळे आपण पुन्हा संभ्रमित होतो.

ओशोंनी म्हटलंय 'मन बडा सूक्ष्म और वंचक है'.

तुम्हाल जरा उलगडा होतोयं आणि स्वास्थ्य येतंय म्हटलं की त्या बोधाविरोधात नवा विचार निर्माण होतो, मग त्या नव्या विचाराच निराकरण करताना तुम्ही पुन्हा अस्वस्थ होता त्यामुळे पुन्हा आपण व्यक्ती आहोत असं वाटायला लागतं. काय मार्ग आहे यातनं?

तुम्हाला पटो न पटो, तुम्ही स्वत:ला सत्य (निराकार जाणीव) समजायला लागा, या सततच्या स्मरणानं तुम्ही स्वस्थ व्हाल. या स्वास्थ्यपूर्ण दशेत अचानक तुमची खात्री होईल की आपली समजूत जी आपल्याला भ्रम वाटत होती, उलगडा जो आपल्याला दुर्लभ वाटत होता, ती वस्तुस्थिती होती आणि व्यक्तीमत्व जी आपल्याला वास्तविकता वाटत होती तो भ्रम होता.

संजय