क्रिश्चिऍनिटीमध्ये कन्फेशन (कबुलीजवाब) ही मनाचा सर्व भार हलका करणारी, मनातल्या अपराधभावाचं निस्सरण करणारी प्रक्रिया आहे.
ओशोंचं एक अप्रतिम विधान आहे, ‘अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं कन्फेशन तुम्हाला मोकळं करतं, ते धर्मगुरुसमोर केलं काय की दगडासमोर त्यानी काही फरक पडत नाही’
आता मजा अशीये की एकेका नकोनकोश्या वाटणाऱ्या प्रसंगातून आपण इतक्या मुष्कीलीनं बाहेर पडलेलो असतो की त्यांची उजळणी मनातल्यामनात देखील आपल्याला जीवघेणी वाटते.
त्यात सगळ्या जीवनाची सर्व कहाणी आपल्या नांवाशी निगडित असते, तिथेच सगळी सुरुवात असते आणि संकेतस्थळावर टोपण नांवाचा पर्याय असल्यानं प्रामाणिकपणाला, कन्फेशन सारख्या अत्यंत गहन प्रक्रियेत मुळातच शह बसतो.
स्वत:ची सर्व गुपितं उघडी करणं हे व्यक्तीला मोकळं करण्याऐवजी नव्या प्रश्नांत अडकवण्याची शक्यता जास्त असते कारण कन्फेशन करावं असं प्रत्येकाला जरी वाटत असलं तरी प्रायश्चित्ताची कुणाची तयारी नसते.
जैन धर्मात क्षमापना ही प्रक्रिया त्यामुळे (कन्फेशनच्याही पुढे जाऊन) केलेल्या अपराधांमुळे नुकसान झालेल्या व्यक्तींची क्षमा मागण्याची प्रक्रिया आहे. जैन धर्मियांनी यावर एक खासा उपाय शोधला आहे, ते क्षमापनेची पोस्टकार्ड छापून घेतात आणि सर्व ओळखीच्यांना पाठवून मोकळे होतात!
मन चलाख आहे, ते तुम्हाला हरघडी अप्रामाणिकपणाच्या मोहात पाडतं, ज्या क्षणी आपण संपूर्ण प्रामाणिक होतो तेव्हा कोणत्याही कन्फेशनची काहीही गरज उरत नाही आणि यदाकदाचित चूक झालीच तर ज्याचं नुकसान झालंय त्याची मनापासून भरपाई करून दिली की खरी क्षमापना होते, आपण निर्भार होतो.
संजय