तुमची कथेची लेखनशैली मला आवडते, तशी ती ह्या कथेतही आवडली. कथेतील काही प्रसंग काल्पनिक आहेत असे तुम्ही प्रतिसादात म्हटले आहे. आता नेमके कोणते प्रसंग काल्पनिक आहेत ह्याची कल्पना नसली तरी माझे एकूण मत सांगते. ही कथा मला थोडी चित्रपटाप्रमाणे काळी-पांढरी वाटली. म्हणजे सविता अतिमहत्त्वाकांक्षी, नात्यांना महत्त्व न देणारी तर विनय पडखाऊ, नात्यांना अति महत्त्व देणारा असा. त्यापेक्षा दोघांच्या स्वभावात काळ्या-पांढऱ्याचं मिश्रण मला अधिक आवडले असते.
पुरेसा विचार वा सर्वंकष विचार न करता निर्णय घेणे कसे अंगाशी येऊ शकते असे हे कथा वाचून वाटले. सविताने कायमचे अमेरिकेत जाण्याचा पर्याय का स्वीकारला हे मला पुरेसे स्पष्ट झाले नाही. तसेही तिचे एम. एस. पूर्ण होऊन तिला नोकरी लागून वर्ष झाले तरीही दत्तकविधानाची पूर्तता झालेली नाही. तेव्हा ती स्टुडंट विजावर अमेरिकेत गेली असणार हे उघड आहे. मग एम. एस. पूर्ण करून तिला भारतात येऊन विनयशी लग्न करून भारतात स्थायिक होणे जमले असते. तसे करायचे नसल्यास, तिचा अमेरिकेत कायम राहण्याचा निर्णय झाला असल्यास आणि विनयला तिच्याशीच लग्न करायचे असल्यास त्याने भारतात व्यवसाय सुरू न करता तिच्यासोबत अमेरिकेत येऊन एम. एस. केले असते तर दोघांनाही एकावेळी नोकरी लागू शकली असती. तिसरा पर्याय म्हणजे लग्नाचा निर्णय अधांतरी ठेवून त्याने त्याचा व्यवसाय तर तिने तिचे एम. एस. करताना त्या दोन वर्षात अधिक विचाराअंती लग्न करणे/न करणे ह्याबाबत निर्णय घेतला असता तर योग्य ठरले असते. मात्र सविताने अमेरिकेत जाण्याचा आणि विनयने लग्न करण्याचा विचार करण्यात घाई केली असे मला वाटले.
सविताचे नेत्राबाबतीतले विचार आणि प्रसंग हे तिच्या काळेपणात मुद्दाम भर घालण्यासाठी वापरले आहेत असे वाटले. हे प्रसंग काल्पनिक असल्यास मला ते खास आवडले नाहीत.
स्वतःला नोकरी नसताना, सविताची नोकरी आणि तिचा एम. बी. ए. करण्याचा विचार असताना आणि दोघांनी अजून तिशीही गाठलेली नसताना मूल लगेच हवे असण्याचा विनयचा विचार चुकीचा वाटला आणि त्याकडे सविताने दुर्लक्ष केले ते योग्य वाटले. नेत्राचे नात्यांना महत्त्व देण्यासाठी नोकरी न करण्याचे विचार पटले/आवडले नाहीत. नोकरी न करता घरी बसणारे नात्यांना अधिक महत्त्व देतात/देऊ शकतात आणि नोकरी करणारे देत नाहीत/ देऊ शकत नाहीत असा सरधोपट विचार कथेतून वाटला तो पटला नाही.