असे असले तरी सचिनला ऑनररी ग्रुप कॅप्टन करणे हे  सवंगपणाचे, पोरकटपणाचे आणि अदूरदृष्टीचे आहे. आर्मी, नेव्ही व एयरफोर्स मधील जवान आणि अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खेळापेक्षा सर्वस्वी भिन्न आहेत. त्यांना देशसंरक्षणाकरता सदैव मरायला तयार असावे लागते.

मी अकरावी-बारावीची दोन वर्षे पुण्यातील ज्या महाविद्यालयातून केली, त्या महाविद्यालयात या दोन वर्षांकरिता एन.सी.सी. हा एक विकल्प उपलब्ध होता, असे आठवते. (मी हा विकल्प घेतलेला नव्हता, त्यामुळे एन.सी.सी.शी माझा काहीही संबंध आलेला नाही, हा पूर्णपणे वेगळा आणि असंबद्ध मुद्दा. तर ते एक असो. ) आमच्याच महाविद्यालयातले पदार्थविज्ञानाचे एक प्राध्यापक यापैकी एन.सी.सी.च्या नौदलाशी संबंधित विभागात संचलन करण्याकरिता शिक्षक म्हणून कार्यरत होते. या कार्यापुरता त्यांना नौदलाचा 'सबलेफ्टनंट' हा (भारतीय नौदलातील कमिशन्ड अधिकाऱ्यांच्या हुद्द्यांपैकी बहुधा निम्नतम) हुद्दादेखील होता, असे आठवते.

आता, आमच्या या प्राध्यापकमजकुरांनी प्रत्यक्षात कधी नौदलाचे एखादे जहाज (म्हणजे, खरेखुरे जहाज. नौदलात नौदलाशी संबंधित अशा कोणत्याही संस्थापनेस - 'एस्टाब्लिशमेंट' असे अर्थी; चूभूद्याघ्या - 'जहाज' असे संबोधण्याची प्रथा आहे, मग भले ती नजीकच्या समुद्रापासून शंभरएक मैल दूर असलेली कोरड्या जमिनीवरची इमारत अथवा संस्था असो, तसे 'जहाज' नव्हे.) पाहिले असावे का, याबद्दल निदान मी तरी साशंक आहे. किंवा, यदाकदाचित एखादवेळेस पाहिले जरी असेल, तरी अशा प्रत्यक्षातल्या एखाद्या जहाजावर ते काम करत नसत, हे निश्चित. किंबहुना, 'एन.सी.सी.ला शिकवणे' अथवा 'एन.सी.सी.ची साप्ताहिक परेड घेणे' याव्यतिरिक्त त्यांचा नौदलाशी अन्य काहीही संबंध नसावा.

म्हणजेच थोडक्यात, या सद्गृहस्थांना 'देशसंरक्षणाकरिता सदैव मरायला तयार असावे लागण्या'चा प्रश्नच नव्हता.

आता, अशा सद्गृहस्थांना, केवळ ते एन.सी.सी.ची साप्ताहिक परेड घेत असत या सबबीखाली, नौदलाचा 'सबलेफ्टनंट' का होईना, पण हुद्दा असणे, हे 'सवंगपणाचे, पोरकटपणाचे किंवा अदूरदृष्टीचे' म्हणावे काय? नौदलातील जवान व अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांपेक्षा या सद्गृहस्थांच्या जबाबदाऱ्या सर्वस्वी भिन्न होत्या म्हणून?

माझ्या मते नाही. कारण, नक्की खात्री नाही, पण माझ्या कल्पनेप्रमाणे, नौदलात - किंवा एकूण लष्करातच - येनकेनप्रकारेण लष्करी सेवेत असणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यास लष्करी हुद्दा अथवा पद (कमिशन्ड/नॉनकमिशन्ड अधिकारीपद अथवा अन्य) देण्याची प्रथा आहे. मग अशी व्यक्ती ही सैनिक अथवा प्रत्यक्ष लढाऊ फौजांतील अधिकारी म्हणून कार्यरत असो, किंवा लष्कराशी निगडित अशा एखाद्या अभियांत्रिकी अथवा वैद्यकीय महाविद्यालयातील निव्वळ प्राध्यापक म्हणून - किंवा बहुधा अन्य कर्मचारी म्हणूनसुद्धा - कार्यरत असो. आणि या प्रथेप्रमाणे, सैन्याला जो योग्य वाटेल तो हुद्दा अथवा पद सैन्याच्या येनकेनप्रकारेण सेवेत असणाऱ्या कोणाही व्यक्तीस देण्याचा संपूर्ण अधिकार सेनेस आहेच.

तस्मात, सैन्याच्याच प्रथेप्रमाणे, सैन्यातील जवान अथवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या - आणि विशेष करून 'देशसंरक्षणाकरिता मरायला तयार असावे लागण्याची आवश्यकता' - यांचा सैन्यातील पदांशी अथवा हुद्द्यांशी अर्थाअर्थी काही थेट संबंध असावा असे वाटत नाही. सबब, सैन्याने आपल्या संपूर्ण अखत्यारीत एखाद्याला एखादे पद देणे हे 'सवंगपणाचे, पोरकटपणाचे अथवा अदूरदृष्टीचे' असण्याबद्दलचे प्रतिपादन हे पूर्णपणे फ़िज़ूल आणि अस्थानी आहे, असे मांडावेसे वाटते.

अतिअवांतर: माझा भारतीय अथवा अन्य कोणत्याही लष्कराशी काहीही संबंध नसून, मीदेखील खास लष्करी भाषेत ज्यास 'ब्लडी सिविलियन' म्हणून संबोधले जाते, त्या क्याटेगरीतच मोडतो, हे येथे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते.