कोणी केले आहे त्यापेक्षा मुळात विधान काय आहे, त्याचा संदर्भ काय आहे आणि विधानाचा शाब्दिक तसेच तार्किक अर्थ काय आहे त्याला महत्त्व द्यावे.
साहित्याचा विचार केला तर अभिजातता प्रामुख्याने कादंबरीलेखनातूनच व्यक्त झालेली आहे. पण म्हणून जी. ए. कुलकर्णींच्या कथा अभिजात नाहीत असे काही ठरत नाही. एकूण अभिजात साहित्यात कथांचे प्रमाण कमी, इतकेच.
वर दिलेल्या किशोरीताईंच्या 'शास्त्रीय संगीत' या शब्दयोजनेचा अर्थ प्रथम मुळातून तपासावा लागेल. वरकरणी वाचतांना 'ख्याल गायन' एवढाच अर्थ दिसतो. एखादी व्यक्ती त्यातठुमरी वगैरे प्रकारांची भर घालेल. पण शास्त्रीय संगीत तेवढेच आहे का? 'ध्रुपद धमार, नोमतोम हेच खरे शास्त्रीय संगीत, बाकी सब झूटः' असे बोलणारे लोक देखील आढलतील. पण म्हणून टप्पा, ठुमरी, वगैरे शास्त्रीय संगीत नाही का? कर्नाटक संगीत शास्त्रीय संगीत नाही का?
नाट्यसंगीत हे प्रामुख्याने उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावरच आधारलेले आहे. काही नाट्यगीते तर केवळ मूळ चिजांचे शब्द बदलून रचलेली आहेत. म्हणजे आधी स्वरयोजना आणि नंतर स्वरयोजना असे झालेले आहे. काही सुप्रसिद्ध नाट्यगीतांत र ला ट जोडून कोंबलेले बडबडगीतसदृश शब्द हे चालीतल्या स्वरयोजनेतील स्वरचित्राशी विसंगत असतील तर त्यामुळे शास्त्रीय संगीताची वाट लागली असे म्हणता येईल. परंतु गायकाचा सुरेल आवाज, शब्दांची उत्कृष्ट फेक, सहवादकांची उत्कृष्ट साथ आणि मुळातली आकर्षक चाल यामुळे ते नाट्यगीत आकर्षक आणि लोकप्रिय होण्याची शक्यता वाढते. कारण काही असो, नाट्यसंगीतामुळे शास्त्रीय संगीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले हे मानावेच लागेल. नाट्यसंगीताचे हे कार्य नाकारणे हा कृतघ्नपणाच होईल. ढोबळमानाने 'वाट लावण्याबद्दल' एकच विधान सरसकट करणे तसे चूकच.
तरी काही नाट्यगीतांमध्ये अभिजातता जपलेली आढळते हे देखील सत्य नाकारता येत नाही. जशा जी एंच्या कथा देखील अभिजात म्हणता येतात तसे. काही झाले तरी अभिजातता आणि आकर्षकता आणि लोकप्रियता या पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत.
कोणतेही उद्दिष्ट समोर ठेवून 'बेतलेल्या' कलाकृती मान्यवरांकडून सहसा अभिजात मानल्या जात नाहीत. संगीताची आणि नाटक या प्रकाराची लोकप्रियता हे उद्दिष्ट ठेवून नाट्यसंगीत जन्माला आले असावे. धर्मप्रसार किंवा तत्त्वज्ञानप्रसार हे उद्दिष्ट भक्तिगीतांमागे असावे. त्यामुळे हे दोन्ही प्रकार अभिजात नाहीत अशी विधाने मान्यवरांनी जर केली तर आश्चर्य वाटायला नको.
असो. शिवाय मान्यवरांमध्ये आढयता, हेवेदावे वगैरे असतातच. पंडित जसराज जेव्हा तबलजी होते तेव्हा 'कातडे खाजवणारा' असा त्यांचा उपमर्द झाला होता. अल्लारखा, सामता प्रसाद वगैरेंचे वादन अभिजात नव्हते का? एक संगीतकार इतरांना तुच्छ मानत असे. त्याने पाळलेल्या एका कुत्र्याचे नाव 'नौशाद' असे ठेवले होते. म्हणून नौशादजी काही सामान्य
ठरत नाही. शिवाय एकाला जे श्रेष्ठ वाटेल ते दुसऱ्याला टाकाऊ वाटू शकते. तेव्हा थोरांच्या मतांना फारशी किंमत न देता आपल्याला आवडते ते संगीत ऐकावे हे खरे. असो. हे विनय हर्डीकर कोण?