नाट्यसंगीताचा जास्त प्रभाव जर पडला तर शास्त्रीय संगीताची जी शान आहे, त्यात स्वरांच्या ज्या श्रुतिव्यवस्था आहेत त्याला जो दर्जा आहे तो खलास होईल.
- हे सहज पडताळून पाहता येईल. निव्वळ वेग, चमत्कृती, हरकती आणि तानांची आतषबाजी यावर आधारलेले संगीत (मग ते फ्युजन असो की नाट्यसंगीत) ऐकण्याची सवय झालेले श्रोते आणि तशी सवय त्यांना लावणारे कलाकार श्रुतिव्यवस्थेकडे (उदा. दरबारीतला कोमल गंधार आणि मल्हारमधला कोमल गंधार यातला फरक) दुर्लक्ष करतात हे खरे आहे (सरसकटपणे नसले तरी).
चांगले 'कानसेन' तयार होण्यासाठी जे सांगीतीक संस्कार घडावे लागतात, त्यात शास्त्रीय संगीतातली अभिजातता आणि श्रुतिव्यवस्थेसारखे बारकावे काटेकोरपणे जपणार्या, तडजोड न करणाअर्या कलाकारांचे मोठे योगदान असते. हे लक्षात घेता शास्त्रीय संगीताची शान आणि दर्जा सातत्याने श्रोत्यांच्या कानावर चुकीचे संस्कार झाल्याने खलास होईल (त्या विषयीची बेपर्वाईची वृत्ती वाढेल, बेमुर्वतपणा सर्वमान्य होईल) असा निष्कर्ष काढणे टोकाचे वाटले तरी त्यात बरेच तथ्य आहे असेच म्हणावे लागेल.