- हे सहज पडताळून पाहता येईल. निव्वळ वेग, चमत्कृती, हरकती आणि तानांची आतषबाजी यावर आधारलेले संगीत (मग ते फ्युजन असो की नाट्यसंगीत) ऐकण्याची सवय झालेले श्रोते आणि तशी सवय त्यांना लावणारे कलाकार श्रुतिव्यवस्थेकडे (उदा. दरबारीतला कोमल गंधार आणि मल्हारमधला कोमल गंधार यातला फरक) दुर्लक्ष करतात हे खरे आहे (सरसकटपणे नसले तरी).

हरिभक्तराव,

आपण मांडलेला मुद्दा मला अगदी योग्य वाटतो आणि म्हणूनच मी त्या वाक्याला 'काहीसा सहमत' असा प्रतिसाद दिला आहे. आता अनायासे आपण हा मुद्दा पुढे आणलाच आहे तर त्यावर मीही काही भाष्य करीन म्हणतो.

उदाहरणादाखल सांगायचं तर 'सोहं हर डमरू बाजे' हे नाट्यपद तोडी रागावर आधारित आहे. परंतु आमचे भीमण्णा जेव्हा तोडीचा विस्तृत ख्याल मांडतात तेव्हा ते कोमल गंधाराच्या, तीव्र मध्यमाच्या किंवा अगदी धैवताच्या ज्या श्रुती दाखवतात, किंवा ती ती स्वरस्थानं दाखवतात ते केवळ अलौकिक आहे. आणि ती स्वरस्थानं अत्यंत ऑथेंटीक (मराठी शब्द? ) असतात म्हणूनच अण्णांचा तो तोडीचा ख्याल, तोडीतल्या कोणत्याही नाट्यपदापेक्षा अधिक दर्जेदार ठरतो/असतो.

एखाद्या क्रिकेटपटूचा जर खरा खेळ पाहायचा असेल वा त्याचा खरा कस लागायचा असेल तर ५ दिवसांचा कसोटी सामनाच पाहावा, असं जे क्रिकेटदर्दी म्हणतात त्याचसारखे हे आहे.

आपला,
(तौलनिक) तात्या.