मराठी संकेतस्थळांवर स्त्रियांची संख्या (पुरुषांच्या तुलनेत) कमी (का) आहे हा प्रश्न माझ्या मते दुय्यम आहे. मराठीब्लॉज डॉट नेट अनुसार मराठी ब्लॉग्ज लिहिणाऱ्यांची संख्या सुमारे २५०० आहे. ती कमी जास्ती होत असते. पूर्वी एकदा ३५०० आकडा पाहिल्याचे आठवते. यात बहुधा स्त्री पुरुष समानता आहे, कदाचित स्त्रियांची संख्या जास्तच भरेल. माझ्या मते जास्त महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ब्लॉग्ज लिहिणाऱ्यांची संख्या इतकी जास्त असताना संकेतस्थळांवर नियमितपणे लिहिणाऱ्या लोकांची (यात स्त्रिया -पुरुष दोघेही आले) फार तर १०० - १५० इतकी कमी का असावी? याचा एक प्रतिवाद मनोगताची सदस्यसंख्या बारा हजाराच्या पुढे आहे तर उपक्रमाची सुमारे पाच हजार आहे या धर्तीवर करता येईल. पण हे सदस्य आहेत कुठे?
या १०० - १५० लोकांमध्ये कदाचित पुरुष जास्त भरतील, पण हा प्रश्न गौण आहे. सुमारे दोन ते तीन हजार जालसाक्षर लोक संकेतस्थळांपासून दूर राहिले आहेत हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
लोकांमध्ये संकेतस्थळांवर लिहिण्याबद्दल इतका अनुत्साह का? संकेतस्थळागणिक याची कारणे वेगळी असतील आणि या सर्व कारणांचा उहापोह जाहीरपणे करता येईलच असे नाही. पण यावर जाहीर चर्चा, निदान मनोगतावर, व्हावी असे मला वाटते. व्यक्तिगत सांगायचे तर आजकाल मनोगतावर इतिहासविषयक चर्चा कमी होत असल्याने माझे लेखन कमी झाले आहे.
विनायक