संकेतस्थळावरचं लेखन : माझा अनुभव

१) प्रथम, चर्चेसाठी स्त्रिया की पुरुष हा मुद्दा बाजूला ठेवून संकेतस्थळावरचं लेखन आणि ब्लॉगवरचं लेखन यात काय फरक आहे ते पाहू कारण अभिव्यक्तीची इच्छा ही प्रत्येकाची आंतरिक ऊर्मी आहे, स्त्री असो की पुरुष.

संकेतस्थळावर आपण स्वत:ला असंख्य मोठ्या जनसमुदायासमोर व्यक्त करत असतो त्यामुळे ब्लॉगवरची सुरक्षितता हरवते, कुणीही काहीही प्रतिसाद देऊ शकतं किंवा लेखनात विशेष दखल घेण्यासारखं काही नसेल तर एकही प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे संकेतस्थळावर लेखन करताना तुमच्याकडे चार गोष्टी लागतात:

विषयाची सखोल जाण (ज्यामुळे वाचकांना नवं काही तरी समजेल), स्वत:चा प्रगल्भ अनुभव, भाषेवर प्रभुत्व आणि तुम्ही विनोदी लिहिणार असाल तर तुमची स्वत:ची स्वतंत्र शैली. या ही पुढे जाऊन तुम्ही सतत लेखन करणार असाल तर लेखन विषयाचं वैविध्य.

या नंतर तिरकस प्रतिसादांना उत्तर देण्याची क्षमता हा लेखनाचा अविभाज्य भाग मानायला हवा तो नसेल तर लेखन थांबतं.

मला वाटतं इतकी सामुग्री असेल तर संकेतस्थळावर लिहिणं कुणालाही शक्य आहे.

२) दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना मराठी टायपिंग येत नाही. मला तर किती तरी प्रतिसाद हातानं लिहिलेले कागद स्कॅन करून येतात.

त्यात मनोगतसारख्या शुद्धलेखनाच्या बाबतीत काटेकोर असणाऱ्या संकेतस्थळावर लिहिणं आणखी मुष्किल आहे. अर्थात मला स्वत:ला या अटीचा जबरदस्त उपयोग झालाय पण तो सराव म्हणजे चिकाटीचं काम आहे.

३) चर्चेत विषयाचं ‘एक सतत भान असणं’ अपेक्षित असतं पण असं भान न राहिल्यामुळे चर्चा मूळ मुद्द्यापासून दूर जातात. स्त्रिया हे सततच भान ठेवून तर्कशुद्ध लिहू शकत नाहीत (दे कांट टो अ लाईन ऑफ आर्ग्युमंट फॉर लाँग) कारण त्यांचा कल भावनिक असतो त्यामुळे चर्चेतही त्यांचा सहभाग फारसा नसतो

संजय