ब्लॉग्ज लिहिणाऱ्यांची संख्या इतकी जास्त असताना संकेतस्थळांवर नियमितपणे लिहिणाऱ्या लोकांची (यात स्त्रिया -पुरुष दोघेही आले) फार तर १०० - १५० इतकी कमी का असावी?

व्यक्त होणे ही माणसाची आजच्या काळातली  प्रकर्षाने जाणवत असलेली गरज असली तरी त्यामागे अहंकार, स्व ची जाणीव की कारणे आहेत.
अशावेळी जाहीरपणे आलेला प्रतिकूल प्रतिसाद पचवणे अवघड असते. ब्लॉगवर तसे प्रतिसाद  प्रकाशित होणार नाहीत अशी व्यवस्था करता येते. एकमेकांचे कौतुक हा प्रमुख उद्देश त्यात साध्य होतो. संकेतस्थळावर तसे होत नाही.  थोडीफर कंपूबाजी असली तरी शेवटी एखादा विरोधी सूर उमटणार हे गृहित धरलेले आहे. तो सहन होतो का? अनेकांबाबत या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. संकेतस्थळावर लेखन करणारे व्यवसायिक लेखक नाहीत. अनेकांचे लेखन दर्जेदार असले तरी लेखनाला मर्यादा आहेत- लेखनात आढळणारे सातत्य आणि दर्जा याचा विचार करता ते मान्य करावे लागते.( सगळे व्यावसायिक लेखन नेहमी दर्जेदारच लिहू शकतात असेही नाही). ही मर्यादा मान्य केली तरी काही चांगले लेखनही संकेतस्थळावर असते हे नाकारता येत नाही. पण  जे इथे लिहितात त्यांना प्रतिसाद देणारा एक वर्ग मात्र स्वयंघोषित व्यासंगी, समीक्षक, प्रज्ञावान इत्यादी इत्यादी आहे.. त्याला संकेतस्थळावरचे लेखन वाचून एक तर प्रेमाचे भरते येते नाही तर जगातील थोर लेखकांच्या मानाने हे लेखन अगदीच किरकोळ आहे असे वाटते. किती लेखकांना अशा परिस्थितीत लेखन करत राहणे शक्य आहे? मुळात लिहिणारा  आपण लेखन का करतो, इथे कशासाठी करतो, आपण कसे लिहितो असे प्रश्न विचारायला लागतो तेव्हा त्याचा परिणाम एकंदर लेखनावर होणार. सृजनशीलता ही रतीबाने टाकायची गोष्ट असेलही पण ती  ज्यांना काडीचीही कदर नाही अशांसाठी ती वाया घालवणे किती जण मान्य करतील?

मी सातत्याने अधिकाधिक चांगले लेखन करेन आणि त्याकरता प्रतिसादांची गरज नाही असे किती लेखक संकेतस्थळावर आहेत? जे खमके आहेत त्यांच्या लेखनात बदल झाले आहेत, ते लिहिते आहेत, इथे नसतील तर इतरत्र आहेत ही सुद्धा आशादायी गोष्ट आहे.
मुळात प्रतिसाद देणे हे कमीपणाचे आहे, मला हवा तसा हवा त्याला प्रतिसाद  देईन, दिला नाही तरी काय फरक पडतो.. मला वेळ नाही , मला अमूक आवडत नाही अशी  अनेक रास्त कारणे,आणि  समज असतील तर इथे लेखन आले तरी अनेक जण फक्त वाचन मात्र आहेत असे दिसते. अर्थात प्रत्येकाने प्रतिसाद द्यावा असा नियम नाही!
पण सर्वाचा परिणाम  मग  प्रतिसादांची संख्या रोडावणे , लेखन कमी होणे यात होईल हे सुद्धा क्रमपाप्त आहे. पैसा, प्रसिद्धी, अहंकार कशालाच खतपाणी मिळणार नसेल तर का लिहावे संकेतस्थळावर? हा प्रश्न कुणी विचारला आणि म्हणून लेखन बंद केले तर त्यात चूक नाही.  फुकट सेवा करणारे कमी आहेत आणि जगात सज्जन मंडळी कमी आहेत तशीही. 

 संकेतस्थळ म्हटले की तिथले नियम पाळणे आवश्यक असते. असे बंधन नको असेल तर स्वतःच्या हातात सूत्रे असणारा ब्लॉग लिहिणाऱ्या व्यक्तीला हवासा वाटणे साहजिक आहे. संकेतस्थळावर असणारे नियम, बंधने आणि त्यावरील सदस्यांचे प्रतिसाद हे  दोन घटक संकेतस्थळावर होणारे लेखन कमी  आहे या करता जबाबदार आहे. संकेतस्थळाच्या प्रशासनाची/ मालकाची भूमिका ठरवण्याचा अधिकार त्यांनाच आहे पण ती भूमिका देखील सदस्य येणे, लिहिते राहणे याकरता जबाबदार असते. अर्थात एक ओपन फोरम आणि सगळे फुकट म्हटले की हे होणार आणि या मर्यादा येणारच. प्रत्येकाने एक नवे अंगण काढून पुन्हा डाव मांडायचा!  ब्लॉग काय किंवा स्वतःचे स्थळ काय... त्याने काय साध्य होईल?  कदाचित आणखी वेगळी ५० माणसे लिहिती होतील. मला तोही  मार्ग  मान्य आहे! लिहा, प्रतिसाद द्या, अधिक चांगले लिहा.

असो. मनोगत लहान होते तेव्हा एक कुटुंब होते, आता अनेक विभक्त कुटुंबे आहेत. तेही मान्य करू. ही एक फेज आहे ती सुद्धा जाईल. इतिहास नाही म्हणून कुणी लिहित नाही, कुणी शुद्धलेखनाचे / मराठीचे नियम म्हणून लिहित नाही.. कुणाला वेळ नाही, सुचत नाही म्हणून लेखन बंद आहे. कुणाची आणखी काही कारणे असतील. सगळी खरी असतील. कोणत्याही संकेतस्थळाचे त्यावाचून अडत नाही. माणसेही पर्याय शोधून काढतात.
पण अगदी खर सांगायच तर मराठी माणसाला सोशल नेटवर्किंग आणि व्यक्त होण्याचे , जाचक न वाटणारे आणि जास्त भुरळ घालणारे पर्याय आज उपलब्ध आहेत ही वस्तुस्थिती आहे.
हे सर्व लक्षात घेता संकेतस्थळावर  लिहिणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे असे मला वाटते.