ही चर्चा एकाच वेळी अनेक संकेतस्थळांवर चालू आहे त्यामुळे जवळजवळ सर्व संकेतस्थळ सदस्यांच्या मनोवृत्तीचं प्रकटणं त्या अनुषंगानं झालंय.

मला सर्वात लक्षवेधी वाटलेली गोष्ट अशी की टोपण नांव आणि व्यक्तीगत माहितीच्या सत्यता पडताळण्याची कोणतीही प्रणाली नसल्यानं, संकेतस्थळांवरचं लेखन जेंडर न्यूट्रल आहे; म्हणजे एका अर्थानं तुम्ही ‘कोण आहात’ त्यापेक्षा तुम्ही ‘काय लिहिता’ याला महत्त्व आहे.

याचा दुसरा भाग अत्यंत मनोरंजक आहे, इंटरनेटच्या वर्च्युअल रियालिटीमध्ये एकच व्यक्ती अनेक रूपं घेऊन आपल्या विविध मानसिकतांसाठी हवे ते प्रयोग करू शकते (याला फक्त आयपी ऍड्रेसचा प्रश्न येतो) पण मग ती हौस वेगवेगळ्या संकेतस्थळांवर वेगवेगळे आयडी घेऊन भागवता येते. म्हणजे ज्या संकेतस्थळांवर प्रशासकीय निर्बंध ढिले आहेत तिथे एखादा वैफल्यग्रस्त (विषयाचं थोडं फार भान ठेवून) काय वाटेल ते प्रतिसाद  देऊन स्वत:ला हलकं करू शकतो, किंवा एखादा भिडस्त काही तरी भेदक नांव घेऊन त्याची व्यक्त होण्याची ऊर्मी दुसऱ्या संकेतस्थळांवर शमवू शकतो. इतकंच काय पण एखादा पुरुष त्याच्या मनात लपलेल्या स्त्रीला तसं नांव देऊन स्त्रीत्वाच्या सर्व कल्पनांची परिपूर्ती संकेतस्थळांवर स्त्री म्हणून वावरून करू शकतो आणि एखादी स्त्री पुरुष म्हणून वावरून स्वत:ची पौरुषत्वाची हौस या वर्च्युअल जगात फिटवू शकते.  

थोडक्यात इंटरनेट माध्यम विदेह असल्यानं लोक त्याचा उपयोग कॅथरसिससाठी करतात (जो त्यांना व्यक्त जगात करता येत नाही).

यामुळे संवेदनाशील व्यक्ती संकेतस्थळांवर लिहायला अनुत्सुक असतात कारण या विदेही माध्यमात कोण केव्हा काय करेल याचा नेम नसतो आणि परिणामी इतक्या चांगल्या माध्यमातून फारसं विधायक काही होत नाही.

संजय