(बहुतेकसे प्रतिसाद विकेण्डला आले, तेव्हा मला वेळ कमी असल्यामुळे इथे येऊ शकले नाही. दिरंगाईबद्दल क्षमस्व.)

मीरा फाटक यांनी दिलेलं, "सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण कमी असणे" हे कारण म्हणून मला फारसं पटत नाही. सुशिक्षित, सुस्थितीत असणाऱ्या कुटुंबांचा विचार करता (जालावर असेच लोक असतात) हे प्रमाण खूप कमी असेल असं मला वाटत नाही. त्यातही तरूण (वय ४५ पेक्षा कमी) पिढीत हा भेद अधिक कमी दिसावा. पण ज्येष्ठ लोकांमध्ये विशेषतः संगणक साक्षर-सुशिक्षितता यांचं लिंगाधारीत प्रमाण वेगवेगळं असेल हे पटतं.
(त्या दृष्टीने पाहता तुम्ही स्वतः, मी, सुवर्णमयी यांना उच्चभ्रूंमध्येही उच्चभ्रू म्हटले पाहिजे.  )

विनायक यांचे ब्लॉगसंदर्भातले विचार आणि सुवर्णमयीने त्यासंदर्भात केलेले विवेचन मला पटले. त्यातही स्त्रियांचा कल ब्लॉगांकडे अधिक असतं हे वातावरण चिंतेचं वाटतं. यातही समानता असेल तर बघायला आवडेल.

>> चर्चा प्रस्ताव इतका साधा सरळ नाही असे मनात येऊन अनेक स्त्रिया गप्प असतील <<
खरं तर हा विषय एवढा सरळ नाही हे मला लोकांचे प्रतिसाद वाचून समजतं आहे. माझं खरोखर अनेक बाबतींमधलं अज्ञान दूर होतं आहे हे मी इथे मान्य केलंच पाहिजे.
दुर्लक्ष आणि अनुल्लेख हे मी समजू शकते. पण मुळात दुर्लक्ष केलं आहे का वाचलंच नाही, अनेक दिवसांत जालावर येऊन पाहिलंच नाही असा प्रश्न पडावा असा वावर अनेक स्त्री-आयडींचा असतो. प्रत्यक्ष संवाद असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यातून अलेक्सा ज्या प्रकारे विदा गोळा करतं ते पहाता लॉगिन केलं काय आणि त्याशिवायच वाचन केलं काय, फरक पडू नये असा तर्क आहे, (खात्री नाही).

संस्थळाची वृत्ती यात सदस्यांची वृत्तीही आलीच. संस्थळ म्हणजे फक्त चालक आणि मालक नव्हे तर तिथे नियमाने लिहीणारे लोकही त्यातच येतात. ध्येयधोरणं बनवताना संस्थळ चालक अर्थातच स्त्रियांना वगळणार नाहीत याची मला खात्री आहे. पण पुरूष आणि स्त्री-स्वभावामुळे यात फरक पडत असेल का? परंपरा, रूढींच्या गुलामगिरीतून असे वेगवेगळे स्वभाव बनत असतील का? आणि ज्या स्त्रियांना जाल वापरणं शक्य आहे, पण त्या काही कारणास्तव संस्थळांवर लिखाण टाळतात त्यांना सामावून घेण्यासाठी संस्थळ चालक, मालक आणि नियमित लिखाण करणारे सदस्य या सर्वांनीच काही विचार करावा का? (हेच पुरूषांबद्दलही म्हणता येईल, पण जालावर ते आधीच ओव्हररिप्रेझेंटेड आहेत.)

स्त्री आणि पुरूषांच्या "मूळ विचारसरणीत फरक असेल असे वाटत नाही", या बाबतीत महेश यांच्याशी सहमती.

इतर काही अवैज्ञानिक तपशीलाने भरलेले, एक उदाहरण देऊन त्याद्वारे सामान्यीकरण करणारे असे  प्रतिसाद आहेत. त्यातला तर्कहीनपणा दाखवून द्यायला सध्या वेळ नाही.