पूर्वीच्या काळी गाण्यांचे रेकॉर्डिंग दोनदा व्हायचे. एकदा चित्रपटात वापरण्यासाठी आणि दुसऱ्यांदा रेकॉर्ड बाजारात आणण्यासाठी. बहुतेक  रेकॉर्डिंग्जसाठी तेच गायक/गायिका वापरले जायचे, तरीही श्री. मिलिंद यांनी दाखवल्याप्रमाणे "अनोखा प्यार" चित्रपटातल्या गाण्यांमध्ये आणि मी दिलेल्या "देख चांद की ओर" या गाण्यामध्ये वेगळे आवाज आहेत. "अनोखा प्यार" चित्रपटासाठी गाणी  करताना नर्गिससाठी मीना कपूरचा आवाज आणि नलिनी जयवंतसाठी लताचा अशी विभागणी होती. पण रेकॉर्डसाठी मात्र अनिल बिस्वास यांनी सर्व गाणी लताच्या आवाजात केली. "देख चांद की ओर" मध्ये दोन वेगळे आवाज राम गांगुलींनी का वापरले कल्पना नाही.

 पण सामान्यपणे जी गाणी चित्रपटात आहेत किंवा बाजारात आलेल्या रेकॉर्डवर आहेत त्यांना "वर्जन साँग्ज" म्हटले जात नाही. (लेख लिहिताना "अनोखा प्यार"ची गाणी वगळण्यामागे तो विचार होता, पण त्याच निकषावर "देख चांद की ओर" पण वगळायला हवे होते, एक ठेवून आणि दुसरे वगळून चूक झाली खरी). क्वचित कधी संगीतकार एखाद्या वेगळ्या गायक/ गायिकेच्या आवाजात, क्वचित स्वतःच्याही आवाजात, प्रयोग म्हणून  रेकोर्डिंग करतात, ते रेकॉर्डिंग बाजारात विक्रीकरता येत नाही, अश्या गाण्यांना वर्जन साँग्ज म्हणतात. ही बाजारात न आलेली गाणी संग्राहक लोक मिळवून जालावर टाकत असल्याने आपल्याला उपलब्ध होत आहेत.

अर्थात चर्चेकरता इतके काटेकोरपणा पाळायची गरज नाही. पण श्री. कुशाग्रांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल माझे मत असे की मीराबाई, कबीर, तुलसीदास, सूरदास, गालिब, मीर तकी मीर, बहादूरशाह जफर यांच्या रचना, नाट्यसंगीत, पारिपरिक रचना अनेक गायक/गायिका गातात आणि पुढेही गात राहील, त्यांना अर्थातच "अनेकावृत्त" म्हणता येईल, पण ज्या अर्थाने लेखातल्या गाण्यांना "वर्जन साँग्ज" म्हणता येते तसे नाही.

विनायक