साधारणपणे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात आमच्या कार्यालयात ’पास्कल’ ह्या प्रोग्रामिंग लॅंग्वेजचे वारे वाहू लागले होते. पास्कलचे पुरस्कर्ते फोर्ट्रानमधील मर्यादा किंवा त्यांच्या मते चुका वगैरे दाखवून पास्कल कशी चांगली आहे हे पटवून देत असत. तेव्हा एक नुकताच महाविद्यालयातून बाहेर पडलेला मुलगा अगदी तावातावाने सांगत असे की अमेरिकेच्या अपोलो आघाड्यांपैकी एक केवळ प्रोग्राम मधील चुकीमुळे अयशस्वी झाली होती. त्यासंबंधीचा प्रोग्राम फोर्ट्रान मध्ये होता आणि एक वेरिएबल डिक्लेअर केलेला नव्हता त्यामुळे असे झाले. त्याचे खापर अर्थातच फोर्ट्रान वर फोडले गेले कारण 'वेरिएबल डिक्लेअर करणे' ही गोष्ट फोर्ट्रान ने वैकल्पिक ठेवली होती. ती  आवश्यक केली असती तर असे झाले नसते.