पहिले प्रेम असे नाही, पण ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे आनंद देऊन गेलेल्या दोन गोष्टी अजूनही मनात रुतून बसल्या आहेत. म्हणजे असे की सुनील गावस्करची बॅटिंग किंवा भीमसेन जोशींचे गाणे ऐकल्यावर आनंद होतोच पण एखादा अप्रसिद्ध खेळाडूची बॅटिंग किंवा अप्रसिद्ध गायकाचे/ गायिकेचे गाणे आनंद देते तो अनुभव अविस्मरणीय असतो.
पहिला अनुभव १९८२ मधला. भारत श्रीलंका पहिला कसोटी सामना सुरू होता. त्या मॅचच्या चौथ्या दिवशी रॉय डायस नावाच्या श्रीलंकेच्या फलंदाजाने केवळ ३५ मिनिटात १५ चौकारांसह ६३ धावा काढल्या, पुढे ९७ धावांवर बाद झाला. ती खेळी पाहिल्यानंतर झालेला आनंद अजूनही विसरलो नाही. त्याची कलात्मकता आकडेवारीत पकडता येणार नाही. त्यासाठी त्याने अन्य एका सामन्यात काढलेल्या ७७ धावांची खेळी बघा रॉय डायस ७७.
दुसरा आयआयटीमधला. शुभांगी मेहेंदळे नावाची मुलगी छान गाते असे केवळ ऐकून होतो. पण १९८५ की ८६ मध्ये ऐकण्याचा योग आला. त्यावेळी तिने किशोरी आमोणकरांनी गायलेले "हे श्यामसुंदर राजसा" गे गीत इतके सुंदर गायले की अंगावर रोमांच उभे राहिले. अर्थात त्या प्रसंगाचे रेकॉर्डिंग नाही पण तिने गायलेले सहेला रे - शुभांगी मेहेंदळे ऐकले तर तिच्या गायनाची कल्पना येऊ शकेल.
विनायक