साहित्याची व्याख्या केवळ ललित कथा, कादंबऱ्या, कविता इतक्यापुरतीच मर्यादित न ठेवता समीक्षक, संतवाङमयाचे अभ्यासक, इतिहासकार, विचारवंत अशी व्यापक घेतली तर वरील यादी समर्पक वाटते. त्या दृष्टीने पहिल्या संमेलनाचे नाव "ग्रंथकारांचे संमेलन" हे जास्त समर्पक वाटते. या अर्थाने घेतले तर कुठलेच नाव आक्षेपार्ह वाटत नाही. लौकिकार्थाने साहित्यिक नसलेल्यांची नावे बघा.
न्यायमूर्ती रानडे, भारताचार्य चिं वि. वैद्य, लोकनायक अणे, न. चिं केळकर, शि. म. परांजपे, सयाजीराव गायकवाड, भवानराव पंतप्रतिनिधी, दत्तो वामन पोतदार, न. र. फाटक, आचार्य जावडेकर, अ. का. प्रियोळकर, कृ. पां. कुलकर्णी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक शं. दा. पेंडसे, श्री. के. क्षीरसागर, रा. श्री. जोग, न. वि. गाडगीळ, वा. ल. कुलकर्णी, वि. भि. कोलते, दुर्गा भागवत, गं. बा. सरदार, राम शेवाळकर, द. भि. कुलकर्णी, वसंत आबाजी डहाके
यावरून असे दिसते की अगदी सुरुवातीपासूनच साहित्यिकाची व्याख्या "ग्रंथकार" अशी व्यापक होती आणि लौकिकार्थाने साहित्यिक नसलेल्या अनेकांच्या कार्याचा सन्मान संमेलनाचे अध्यक्षपद देऊन झाला. त्यामुळे आता अचानक भूमिका बदलून फक्त कथा - कादंबरी- कविता लिहिणाऱ्यांनाच संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे असा आग्रह मला अनाठायी वाटतो. अगदीच वाटत असेल तर साहित्य संमेलनाचे नाव बदलून ग्रंथकारांचे संमेलन करावे.
असली तर एकच खंत आहे. या यादीत लोकमान्य टिळक, आगरकर, इतिहासकार राजवाडे, इतिहासकार शेजवलकर, विचारवंत कुरुंदकर ही नावे दिसत नाहीत. अर्थात कुरुंदकरांचे वयाच्या ५० व्या वर्षी अचानक निधन झाले, अन्यथा ते नक्की अध्यक्ष झाले असते.
विनायक