इंग्रजांचा अंमल असून वजनात पाउंड कसा शिरला नाही हे आश्चर्यच आहे. शिरला होता. चहा-कॉफी -कोको पौंडात मिळायचे. तसेच हॉर्लिक्स, ओव्हलटिन, बार्ली यांच्या बाटल्या किंवा डब्यांवर आतील मालाचे वजन पाउंडात लिहिले असायचे. बिस्किटाचे किंवा इतर वस्तू ठेवण्याचे पत्र्याचे डबे यांचे माप पाच-पौंडी डबा, ३५-पौंडी डबा असे पौंडात सांगितले जायचे. माणसाचे वजन पौंडात असे. लहान बाळाचे वजन तर अजूनही पौंडात सांगतात. छापखान्यासाठी लागणाऱ्या कागदाचा दर्जाही अजून पौंडात मोजतात. २४ पौंडी कागद म्हणजे कागदाची प्रत अशी की , ठरावीक मापाच्या त्या कागदाच्या ५०० तावांचे वजन २४ पौंड असेल.(चू.भू.द्या. घ्या.) .
मुंबईत तर वजनी शेर जवळजवळ नव्हताच. पौंड हेच तिथले वजन होते. मात्र त्याला मुंबईत रत्तल म्हणत. अगदी किलो आला तरी काही वर्षे रत्तल हे वजन व्यवहारात होते. दादरच्या भाजी बाजारातून रत्तल गेल्यावर त्याची जागा 'अर्ध्या किलो'ने घेतली. (मुंबईच्या काही उपनगरांत ४०० ग्रॅमने ! ) नक्की माहीत नाही, पण कदाचित अजूनही दादरला भाजी अर्ध्या किलोत मोजत असतील.
पुण्यातले भाजीवाले ५०ग्रॅमला छटाक म्हणतात, आणि १०० ग्रॅमला अदपाव. अगदी आजही !