वरील वजनांमध्ये अधोलीचा उल्लेख झालेला दिसला नाही. अधोली म्हणजे अर्धी पायली(दोन शेर).
बंगालमधल्या वजनांचा निर्देश वर झाला आहे. अशीच विविध नावांची वजने-मापे भारतात होती. मद्रास राज्यात पालम आणि वीस नावाची वजने आणि ओळ्ळक, पड्डी, मरकळ, फरा आणि गारी नावाची मापे होती.
महाराष्ट्रात चिमूट, मूठ, पसा(ओंजळ), फुलपात्र, सूप आणि परात हीही अंदाजे मापण्याची मापे होती, आणि अजूनही आहेत. ब्रिटिशांनी चहाचा चमचा, टेबलस्पून, डेझर्ट स्पून आणि चहाचा कप ही मापे आणली. एक चहाचा चमचा म्हणजे पाच मिलिलिटर. एक कप म्हणजे चार औंस. रेल्वेतला मोठा कप ७ औंसाचा होता. तो आता कुठे दिसत नाही.
पाणी मोजण्यासाठी , भांडे, तांब्या, पातेले, बोगणे, कळशी, हंडा आणि घंगाळे ही मापे पूर्वापार चालत आली आहेत, आणि आता त्यांत बादलीची आणि पिपाची भर पडली आहे.तेल किंवा आमटी-पातळ भाजी वगैरे मोजण्यासाठी पळी हे माप प्रचलित आहे.
माती, वाळू वगैरे घमेल्यांनी मोजतात. जास्त माती-वाळू असेल तर ती टेंपो आणि ट्रक या मापांनी मोजतात. सदतीस घमेली बागेची माती म्हणजे एक टेंपो माती. बांधकामाचे मोजमाप ब्रासमध्ये होते. पाच फूट उंच आणि दहा फूट लांब अशा एकेरी विटेच्या भिंतीचे बांधकाम म्हणजे एक ब्रास बांधकाम. (चूभूद्याघ्या)
धरणाचे पाणी घनफूट, घनमीटर किंवा दशलक्ष लिटरमध्ये मापतात, तर पाण्याचा उत्सर्ग क्यूसेक्समध्ये.