रोशन आणि सी. रामचंद्र (अण्णा) हे जिवलग मित्र आणि गुरूबंधू (संगीतकार अनिल बिस्वास यांचे शिष्य म्हणून) होते. दोघेही साधारण एकाच वयाचे होते तरी चित्रपटसृष्टीत अण्णा रोशन यांच्यापेक्षा ज्येष्ठ होते. सी. रामचंद्र प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांना अनेकवेळा काम जास्त आल्याने चित्रपट नाकारावे लागत. अश्यावेळी ते रोशनची शिफारस करीत." रोशन माझ्याइतकाच चांगला संगीतकार आहे" असे ते लोकांना सांगत. एकदा त्यांना कोणीतरी मदनमोहनबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले  "मदनमोहन चांगला आहेच, पण रोशन त्याच्यापेक्षा चांगला आहे. त्याच्या संगीतात अभिजातपणा आहे." 

""बराती"हा चित्रपट अण्णांनी नाकारून निर्मात्याकडे रोशनची शिफारस केल्याने रोशनकडे आला होता. या" बराती"मध्ये एक गाणे सी. रामचंद्र यांच्या आवाजात आहे. स्वतःच्या संगीतनिर्देशनाबाहेर अण्णांनी गायलेले हे एक आणि दुसरे अनिल बिस्वासच्या संगीतनिर्देशनात गायलेले अशी दोनच गाणी असावीत.

आता "ये जिंदगी उसी की है बद्दल". संगीतकार रोशनचे १६ नोव्हेंबर १९६७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. लता मंगेशकर आणि सर्वच मंगेशकर कुटुंबियांचे रोशनशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने लताने श्रद्धांजली म्हणून रोशनवर एक लेख लोकसत्तामध्ये लिहिला. त्यात तिने "ये जिंदगी उसी की है" या गाण्याची चाल सी. रामचंद्रांना सुचत नव्हती त्यावेळी रोशन यांनी ती बांधली " असा उल्लेख केला होता. अण्णा त्यावेळी आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. ते भारतात परतल्यावर पत्रकारांनी  विचारले असता ते म्हणाले "मित्र म्हणून रोशनने काही सूचना केल्या होत्या, पण हे शेवटी माझे गाणे असल्याने मी त्या मानल्या नाहीत. "

याबद्दल मला असे वाटते.  अण्णा आणि लताचे संबंध बिघडल्याने लताने रोशनच्या मृत्यूचा प्रसंग साधून अण्णांवर वार केला. अण्णांची परिस्थिती बिकट झाली, कारण एकीकडे जिवलग मित्राचा नुकताच  मृत्यू झालेला. लताची कहाणी नाकारावी तर लोक म्हणणार मित्राचे श्रेय नाकारतो आहे. स्वीकारावी तर आपण संगीतकार म्हणून कमी पडलो हे मान्य केल्यासारखे आहे. पण लताला एका गोष्टीचे श्रेय द्यायला हवे की तिने अण्णा हयात असताना हा दावा केला होता.

हृदयनाथाने हा दावा रोशन गेल्यावर ४४ -४५ वर्षांनी आणि अण्णा गेल्यावर २९-३० वर्षांनी करणे अनाकलनीय आहे. त्यातही ज्या १९५२ - ५३ मध्ये ही घटना घडली तेव्हा हृदयनाथ जेमतेम ११-१२ वर्षांचा असावा. त्या वयात घडलेल्या गोष्टी इतक्या स्पष्टपणे ६० वर्षांनंतरही आठवतात?

नेमके काय झाले असावे? शिरीष कणेकरांनी लिहिले आहे त्यावरून अण्णांना हे गाणे कसे संपवायचे ते समजत नव्हते आणि ते "अलविदा, अलविदा" करून संपवावे असे रोशनने सांगितले, ते अण्णांनी मान्य केले इतकेच खरे असावे. संपूर्ण गाण्याची चाल रोशनने बांधली हे लता - हृदयनाथांचे म्हणणे खरे नाही तसेच अण्णांचे  "मी रोशनची सूचना मानली नाही" हे अण्णांचे वाक्यही खरे नसावे.

माझ्यासारख्या "डाय - हार्ड" रोशनच्या चाहत्यालासुद्धा यातले राजकारण लक्षात येते. रोशन मोठा होताच. त्याला मोठे ठरवण्यासाठी अण्णांना छोटे ठरवायची गरज नाही.

बाकी नौशादच्या बढाया मारण्याच्या सवयीचा वीट आला आहे.त्याच्या इतक्या मुलाखती पाहिल्या, ऐकल्या पण त्याचे सहाय्यक गुलाम मोहम्मद, मोहम्मद शफी आणि गीतकार शकील बदायुनी यांच्याबद्दल चांगले बोलेल तर शपथ. एवढा तू मोठा तर शकील आणि गुलाम मोहम्मद यांचे निधन झाल्यावर तुझा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कसा रे कोसळला असे त्याला विचारावेसे वाटत होते.

विनायक